धोनी नसताना सीएसकेचं कसं आहे रेकॉर्ड

IPL 2026 CSK vs RCB: आयपीएल 2026 मधील रोमांचक लढतीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघानं चेन्नई सुपर किंग्स (CSK) वर 43 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. हा सामना रविवार, 5 एप्रिल 2026 रोजी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला.

आरसीबीनं निर्धारित 20 षटकांत 3 बाद 250 धावांचा डोंगर उभा केला. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध कोणत्याही संघानं केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. या विक्रमी डावाचा खरा नायक ठरला तो म्हणजे टिम डेव्हिड. त्यानं फक्त 25 चेंडूंत 3 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीनं नाबाद 70 धावा कुटल्या. त्याला देवदत्त पडिक्कल (50 धावा) आणि कर्णधार रजत पाटीदार (नाबाद 48 धावा) यांनी मोलाची साथ दिली. चेन्नईच्या गोलंदाजांनी अखेरच्या पाच षटकांत तब्बल 97 धावा खर्च केल्या, ज्यामुळे सामना पूर्णपणे चेन्नईच्या हातातून निसटला.

तर 251 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. ऋतुराज गायकवाड (9), संजू सॅमसन (9) आणि आयुष म्हात्रे (1) हे तिन्ही सलामीवीर अवघ्या 3 षटकांच्या आत तंबूत परतले. मधल्या फळीत सरफराज खाननं 25 चेंडूंत 50 धावा करून एकतर्फी झुंज दिली, तर प्रशांत वीर (43) आणि जेमी ओव्हरटन (37) यांनी विजयासाठी प्रयत्न केले, पण आरसीबीच्या गोलंदाजीसमोर चेन्नईचा डाव 19.4 षटकांत 207 धावांवर आटोपला. चेन्नईच्या या पराभवाचं मुख्य कारण गोलंदाजांनी दिलेल्या जास्त धावा, क्षेत्ररक्षण केलेल्या चुका आणि अव्वल फळीतील फलंदाजांचं अपयश हे राहिलं.

ऐतिहासिक आकडेवारीवर नजर टाकली तर, आयपीएलमध्ये आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकूण 36 सामने झाले आहेत. यात चेन्नईनं 21 तर आरसीबीनं 14 सामने जिंकले आहेत (1 सामना अनिर्णित). जरी ऐतिहासिकदृष्ट्या चेन्नईचं पारडं जड असलं, तरी कालच्या विजयामुळे आरसीबीनं गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. दुसरीकडे, सलग तीन पराभवांमुळे चेन्नई सुपर किंग्सचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या (10 व्या) स्थानावर फेकला गेला आहे.

धोनी नसताना सीएसके
आयपीएल 2026 च्या सुरूवातीपासूनच सीएसके संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याला दुखापत झाल्यामुळे तो काही सामने बाहेर आहे. पण तो बाहेर असताना यावर्षी सीएसके संघानं एकही सामना जिंकला नाही. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये धोनी 7 सामने खेळला नाही त्यातल्या फक्त एकाच सामन्यात सीएसकेनं विजय मिळवला आहे. बाकी धोनी नसताना सीएसके संघानं 6 सामने गमावले आहेत. आणि शेवटचा सामना 2010 साली जिंकला होता.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.