FA Cup 2026: नुकत्याच झालेल्या (शनिवार, 4 एप्रिल 2026) एफए कप 2026 च्या उपांत्यपूर्व फेरीत पेप गार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखालील मॅनचेस्टर सिटीनं घरच्या मैदानात आपला दबदबा कायम राखला आहे. सिटीनं लिव्हरपूलचा 4-0 असा धुव्वा उडवत दिमाखात उपांत्य फेरीत (Semi-final) प्रवेश करून लिव्हरपूलला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या विजयामुळे मॅनचेस्टर सिटीनं सलग आठव्या हंगामात एफए कपच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केला आहे. हा सामना मॅनचेस्टरमधील इतिहाद स्टेडियमवर हा ऐतिहासिक सामना पार पडला.
मॅनचेस्टर सिटीच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे स्टार स्ट्रायकर अर्लिंग हालांड. हालांडनं या सामन्यात शानदार हॅट्ट्रिक (3 गोल) नोंदवून लिव्हरपूलच्या बचाव फळीला खिंडार पाडलं. त्यानं 39 व्या मिनिटाला पेनल्टीवर पहिला गोल केला, त्यानंतर त्यानं 45 व्या मिनिटाला दुसरा गोल आणि 57 व्या मिनिटाला तिसरा गोल पुर्ण केला. हालांड व्यतिरिक्त अँटोइन सेमेन्योनं 50 व्या मिनिटाला एक गोल करून सिटीची आघाडी 4-0 अशी मजबूत केली. सिटीच्या बचाव फळीनं आणि गोलरक्षक जेम्स ट्रॅफोर्डनं लिव्हरपूलच्या मोहम्मद सालाहला पेनल्टीवर गोल करण्यापासून रोखत ‘क्लीन शीट’ राखली.
या विजयामुळे मॅनचेस्टर सिटीनं एफए कपच्या इतिहासात घरच्या मैदानावर (Home Ground) सलग 18 सामने जिंकण्याचा 145 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी क्लॅफम रोव्हर्सनं 1873 ते 1881 दरम्यान सलग 17 घरचे सामने जिंकले होते. सिटीची ही विजयी मालिका फेब्रुवारी 2017 पासून सुरू आहे.
या विजयानंतर सिटी आता उपांत्य फेरीत पोहोचली असून हे सामने वेम्बली स्टेडियमवर खेळवले जातील. सिटीचा प्रतिस्पर्धी अद्याप निश्चित झालेला नाही, कारण उपांत्य फेरीची सोडत (Draw) 5 एप्रिल रोजी होणार आहे.
मॅनचेस्टर सिटीनं आतापर्यंत एकूण 7 वेळा एफए कपचे जेतेपद पटकावले आहे.

