Indian women’s hockey team: भारतीय महिला हॉकी संघ एप्रिल महिन्यात अर्जेंटिनाला रवाना होणार असून तेथे ब्युनोस आयर्स येथील ‘CeNARD’ (नॅशनल सेंटर ऑफ हाय परफॉर्मन्स ॲथलेटिक्स) मैदानावर अर्जेंटिनाच्या तगड्या संघाविरुद्ध चार सामन्यांची मालिका खेळणार आहे. हे सामने 13, 14, 16 आणि 17 एप्रिल 2026 रोजी खेळवले जातील. हा दौरा भारतीय संघासाठी 2026 मधील महिला हॉकी विश्वचषक आणि आशियाई क्रीडा स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
अर्जेंटिनाच्या या दौऱ्यासाठी अनुभवी मिडफील्डर्स सलीमा टेटे (Salima Tete) हिच्याकडं संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. या संघाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे स्टार गोलरक्षक सविता पुनिया आणि प्रमुख ड्रॅग-फ्लिकर दीपिका यांचं संघात झालेलं पुनरागमन. या दोघींच्या येण्यानं भारताचा बचाव आणि आक्रमण दोन्ही बाजू मजबूत झाल्या आहेत.
24 सदस्यीय संघ
गोलकीपर्स: सविता पुनिया आणि बिचू देवी खरीबाम
डिफेंडर्स (बचावपटू): निक्की प्रधान, ईशिका चौधरी, सुशीला चानू पुखरामबम, मनीषा चौहान, लालथांटलुआंगी, ज्योती आणि उदिता
मिडफील्डर्स (मध्यरक्षक): सलीमा टेटे (कर्णधार), वैष्णवी विठ्ठल फाळके, नेहा, दीपिका सोरेंग, ऋतुजा पिसाळ, साक्षी राणा, सुनीलिता टोप्पो आणि ईशिका
फॉरवर्ड्स (आक्रमक): नवनीत कौर, दीपिका, मुमताज खान, बलाईत कौर, अन्नू, ब्युटी डुंगडुंग आणि लालरेमसियामी
प्रशिक्षक मारिन म्हणाले की, “अर्जेंटिना हा जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणे हे आमच्या खेळाडूंसाठी शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही आघाड्यांवर एक मोठे आव्हान असेल, जे आम्हाला स्वतःला तपासण्यासाठी आवश्यक आहे.” तसेच त्यांनी संघाच्या निवडीवर समाधान व्यक्त करताना सांगितले की, “सविता पुनिया आणि दीपिका यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या पुनरागमनामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्याचवेळी रुतुजा पिसाळ आणि साक्षी राणा यांसारख्या युवा खेळाडूंना अशा मोठ्या दौऱ्यावर संधी मिळणे त्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे आहे”.

