सोची (रशिया): भारतीय युवा महिला फुटबॉल संघ (यंग टायग्रेसेस) सध्या रशियाच्या दौऱ्यावर असून आज, 17 एप्रिल 2026 रोजी मालिकेतील तिसरा आणि अंतिम मैत्रीपूर्ण सामना खेळवला जाणार आहे. सोची येथील ‘मॅटसेस्टा फुटबॉल सेंटर’ येथे होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघासमोर रशियाच्या बलाढ्य संघाला रोखण्याचं आणि मालिकेत सन्मानजनक कामगिरी करण्याचं मोठं आव्हान असेल.
या दौऱ्यातील पहिले दोन सामने भारतीय संघासाठी खडतर ठरले आहेत. कारण 11 एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात रशियानं भारताचा 4-0 असा पराभव केला होता. त्यानंतर 14 एप्रिलला झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय बचावफळीनं काहीसा सुधारित खेळ दाखवला, मात्र तरीही रशियानं 3-0 ने बाजी मारलीच. रशियाच्या वॅलेरिया मेनालिओव्हाने या दोन्ही सामन्यांत मिळून 3 गोल करत भारताची डोकेदुखी वाढवली आहे. भारतीय खेळाडूंनी आक्रमणात काही चांगल्या संधी निर्माण केल्या, पण रशियन गोलरक्षकाला चकवण्यात त्यांना अद्याप यश आलेलं नाही.
हे सामने फक्त सराव नसून त्यामागे भारतीय संघ पुढील महिन्यात चीनमध्ये होणाऱ्या ‘एएफसी अंडर-17 महिला आशिया चषक 2026’ (AFC U17 Women’s Asian Cup) या मोठ्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. रशियासारख्या शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत संघाविरुद्ध खेळल्यामुळे भारतीय खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावाचा सामना करण्याचा अनुभव मिळत आहे. या सामन्यांद्वारे प्रशिक्षक पाचवेला काँटी यांना संघातील उणिवा आणि खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा अंदाज घेत आहेत, जे आशिया चषकात ऑस्ट्रेलिया आणि जपानसारख्या संघांविरुद्ध खेळताना उपयोगी ठरेल.
आणखी हेही वाचा
भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने-https://agcsport.tv/cricket/india-and-south-africa-face-to-face/
कार्लोस अल्काराजची बार्सिलोना ओपनमधून धक्कादायक माघार-https://agcsport.tv/tennis/carlos-alcarazs-shock-withdrawal-from-barcelona-open/

