ब्राइटनचा चेल्सीवर ३-० ने दणदणीत विजय

EPL: इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये (EPL) ब्राइटन अँड होव्ह अल्बियननं आपला दबदबा कायम राखत चेल्सीचा 3-0 असा धुव्वा उडवला आहे. मंगळवारी रात्री ब्राइटनच्या घरच्या मैदानावर, ‘अमेरिकन एक्सप्रेस स्टेडियम’ येथे पार पडलेल्या या सामन्यात चेल्सीचा संघ पूर्णपणे निष्प्रभ ठरला. या मोठ्या विजयामुळे ब्राइटननं गुणतालिकेत झेप घेतली असून चेल्सीच्या अडचणीत मात्र मोठी वाढ झाली आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच ब्राइटननं आक्रमक पवित्रा घेतला. खेळाच्या अवघ्या 3 ऱ्या मिनिटाला फर्दी कादिओग्लूनं गोल करून यजमानांना 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. चेल्सीनं पुनरागमनाचा प्रयत्न केला खरा, पण 56 व्या मिनिटाला जॅक हिंशलवुडनं दुसरा गोल डागून चेल्सीच्या आशांना सुरुंग लावला. सामन्याच्या शेवटच्या क्षणी (90+1 मिनिट) अनुभवी डॅनी वेलबेकनं तिसरा गोल करत चेल्सीच्या पराभवावर शिक्कामोर्तब केलं. या सामन्यात तिन्ही गोल वेगवेगळ्या खेळाडूंनी नोंदवले असून, चेल्सीला गोल करण्याची एकही मोठी संधी निर्माण करता आली नाही.

या विजयानंतर 34 सामन्यांत 50 गुणांसह ब्राइटन आता गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. युरोपियन स्पर्धांच्या पात्रतेसाठी ब्राइटन आता प्रबळ दावेदार मानला जात आहे. दुसरीकडं, चेल्सी 48 गुणांसह सातव्या स्थानावर फेकला गेला आहे. 1992 नंतर पहिल्यांदाच चेल्सीला सलग पाच लीग सामन्यांत एकही गोल करता आलेला नाही, ही आकडेवारी त्यांच्या दयनीय अवस्थेची साक्ष देते.

इंग्लिश प्रीमियर लीग ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी आणि सर्वात श्रीमंत फुटबॉल लीग आहे. यात इंग्लंडमधील 20 सर्वोत्तम क्लब सहभागी होतात. प्रत्येक मोसमात 38 सामने खेळवले जातात आणि अव्वल चार संघांना प्रतिष्ठेच्या ‘चॅम्पियन्स लीग’मध्ये खेळण्याची संधी मिळते.

आणखी हेही वाचा
“प्रियांश आर्या हा म्हात्रे आणि सूर्यवंशीपेक्षाही सरस खेळाडू!” अश्विनचं मोठं विधान-https://agcsport.tv/cricket/priyansh-arya-is-a-better-player-than-mhatre-and-suryavanshi-ashwins-big-statement/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.