बार्सिलोना (Barcelona): स्पॅनिश महिला फुटबॉलमध्ये बार्सिलोना (FC Barcelona Femení) संघानं आपल्या वर्चस्वाची सत्ता कायम राखली आहे. बुधवारी (22 एप्रिल 2026) पार पडलेल्या निर्णायक सामन्यात बार्सिलोनानं आरसीडी एस्पॅनॉलचा 4-1 असा धुव्वा उडवला. या विजयासह बार्सिलोनानं ‘वूमेन्स स्पॅनिश लीग’वर (Liga F) सलग सातव्यांदा आपलं नाव कोरलं आहे.
एस्पॅनॉलच्या ‘सीउटाट एस्पोर्टिवा डॅनी जार्के’ स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बार्सिलोनानं सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. या मोठ्या विजयाची शिल्पकार ठरली ती म्हणजे नॉर्वेची 18 वर्षीय युवा स्ट्रायकर मार्टिन फेंगर. तिनं या सामन्यात सर्वाधिक दोन गोल केले आणि प्रतिस्पर्ध्यांची बचावफळी खिळखिळी केली. तिला कार्ला ज्युलिया आणि अनुभवी कॅरोलिन ग्रॅहम हॅन्सन यांनी प्रत्येकी एक गोल करून मोलाची साथ दिली. एस्पॅनॉलच्या लायआ बॅलेस्टे हिनं एक गोल करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तो पुरेसा ठरला नाही.
ऐतिहासिक विक्रम
बार्सिलोना महिला संघानं 2020 पासून सलग सात वर्षे लीग चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला आहे. या क्लबनं 2019-20, 2020-21, 2021-22, 2022-23, 2023-24, 2024-25 आणि आता 2025-26 अशा सातही हंगामात ट्रॉफी आपल्याकडंच राखली आहे. हे बार्सिलोनाचं एकूण 11 वे लीग विजेतेपद असून, स्पेनमधील कोणत्याही महिला संघापेक्षा ही आकडेवारी सर्वाधिक आहे.
यंदाच्या हंगामात बार्सिलोनाचं वर्चस्व थक्क करणारे आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या 26 सामन्यांपैकी 25 सामन्यांत विजय मिळवला आहे. संघानं तब्बल 116 गोल केले असून त्यांच्याविरुद्ध फक्त 7 गोल झाले आहेत. या विजयामुळे 75 गुणांसह ते गुणतालिकेत अव्वल स्थानी असून, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिअल माद्रिदपेक्षा ते 16 गुणांनी पुढे आहेत.
या विजयानंतर आता बार्सिलोना संघाचं पूर्ण लक्ष ‘युईएफए महिला चॅम्पियन्स लीग’वर (UWCL) केंद्रित झालं आहे.

