IPL 2026 RCB vs RR: आयपीएल 2026 मधील 16 व्या सामन्यात आज (10 एप्रिल 2026) राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. हा रोमांचक सामना गुवाहाटी येथील एसीए बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
आजचा सामना आयपीएल 2026 मधील सर्वात चुरशीचा मुकाबला ठरण्याची शक्यता आहे, कारण राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या दोन्ही संघांनी अद्याप या हंगामात पराभवाचा सामना केलेला नाही. यजमान राजस्थान रॉयल्सनं आतापर्यंत खेळलेले तिन्ही सामने (चेन्नई, गुजरात आणि मुंबई विरुद्ध) जिंकून गुणतालिकेत 6 गुणांसह अव्वल (पहिल्या) स्थानी झेप घेतली आहे. मागील सामन्यात त्यांनी मुंबई इंडियन्सवर 27 धावांनी दिमाखदार विजय मिळवला होता, ज्यात सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी यांच्या स्फोटक फलंदाजीचा मोठा वाटा होता.
दुसरीकडं, गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं देखील आपल्या दोन्ही सुरुवातीच्या सामन्यांत (हैदराबाद आणि चेन्नई विरुद्ध) विजय मिळवला असून ते 4 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. बेंगळुरूनं आपल्या मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला 43 धावांनी नमवलं होतं, ज्यात फलंदाजांनी 250 धावांचा डोंगर उभा केला होता.
जर या दोन्ही संघाच्या आयपीएलमधील आमने-सामने लढतीवर नजर टाकली तर, आयपीएलमध्ये या दोन संघांमध्ये आतापर्यंत एकूण 34 सामने झाले आहेत. यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचं पारडं किंचित जड असून त्यांनी 17 सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्सला 14 सामन्यांत बाजी मारता आली आहे (3 सामने अनिर्णित राहिले आहेत).
गुवाहाटीच्या मैदानावर फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज या दोघांनाही मदत मिळण्याची शक्यता असली तरी, दव (Dew) फॅक्टरमुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणं अधिक सोपं होऊ शकतं, ज्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीला पसंती देऊ शकतो.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग 11
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals): यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा आणि रवी बिश्नोई.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bengaluru): विराट कोहली, फिल साल्ट (यष्टीरक्षक), रजत पाटीदार (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, टीम डेव्हिड, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जॅकब डफी आणि अभिनंदन सिंह.

