KKR vs LSG: आयपीएल 2026 मधील 15 व्या सामन्यात आज (9 एप्रिल 2026) कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना कोलकत्त्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे.
कोलकत्त्याची सुरुवात यंदा अत्यंत निराशाजनक झाली आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेले 3 पैकी 2 सामने गमावले आहे. तर मागिल सामना (पंजाब विरुद्धचा) त्यांच्याच घरच्या मैदानावर खेळवला गेला होता पण पावसामुळे तो सामना अनिर्णित राहिला होता. त्यामुळे दोन्ही संघाला एक-एक गुण देण्यात आला होता. त्या एका गुणामुळे सध्या कोलकत्त्याचा संघ गुणतालिकेत 9 व्या स्थानावर आहे.
तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सनं या हंगामात आतापर्यंत खेळलेल्या 2 पैकी 1 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांनी आपल्या शेवटच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 5 गडी राखून विजय मिळवला होता. तर त्या 2 गुणांसह लखनऊ सध्या 7 व्या स्थानावर आहे.
हेड-टू-हेड रेकॉर्ड
आयपीएल इतिहासात या दोन संघांमध्ये आतापर्यंत एकूण 6 सामने झाले आहेत. यात लखनऊ सुपर जायंट्सचं पारडं जड असून त्यांनी 4 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर कोलकत्ता नाईट रायडर्सला फक्त 2 सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे केकेआरचा कर्णधार आता कशा पद्धतीनं आजचा सामना जिंकेल आणि कोणती रणनीती आखेल याकडं केकेआरच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांना आशा आहे की, हे नकोशा असलेले आकड्यांमध्येही आज बदल घडून येतील. पण दुसरीकडे लखनऊ सुद्धा यंदाच्या हंगामात कमालीच्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे लखनऊ केकेआरला हरवून त्यांच्याविरूद्धच रेकॉर्ड आणखी चांगला करण्याचा प्रयत्न करतील.
केकेआरला झटका
दुखापतीमुळे सुनिल नरेन याला पंजाबविरूद्धचा मागिल सामना खेळता आला नव्हता. तर वरुण चक्रवर्तीही डाव्या हाताला दुखापत झाल्यामुळे त्या सामन्यात खेळला नव्हता. पण सुनिल नरेन हा आजचा सामना खेळण्याची शक्यता सांगितली जात आहे. मात्र, वरूण चक्रवर्ती आजचा सामना खेळेल की नाही याबद्दल शंका आहे. कारण सनरायझर्स हैदराबादविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना वरुणच्या डाव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्याला मागिल सामनाही खेळता आला नव्हता. पण त्यानं बुधवारी सरावात ‘संपूर्ण सेट’ गोलंदाजी केली, असं केकेआरच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. पण वरुणच्या पुनरागमनाची वेळ अद्यापही निश्चित केली नाही. त्यामुळे आजच्या सामन्याला तो मुकण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
आजची संभाव्य प्लेइंग 11 (Probable XI)
कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR): फिन ॲलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमरन ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), रिंकू सिंह (उपकर्णधार), रमणदीप सिंह, रोव्हमन पॉवेल, सुनील नरेन, अनुकुल रॉय, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुझाराबानी, कार्तिक त्यागी
लखनऊ सुपर जायंट्स (LSG): मिचेल मार्श, एडन मार्करम, ऋषभ पंत (कर्णधार व यष्टीरक्षक), निकोलस पूरन, अब्दुल समद, आयुष बडोनी, शहबाज अहमद, मोहम्मद शमी, आवेश खान, म. सिद्धार्थ आणि मयंक यादव.
आणखी हेही वाचा
दिल्लीने कुठे गमावला सामना– https://agcsport.tv/ipl-2026/where-did-delhi-lose-the-match/
कोलकत्ता पंजाबचा सामना पावसामुळे रद्द– https://agcsport.tv/ipl-2026/kolkata-punjab-match-called-off-due-to-rain/

