RCB vs DC IPL 2026: आयपीएल 2026 च्या 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघानं दिल्ली कॅपिटल्सचा (DC) त्यांच्याच घरच्या मैदानात अक्षरशः धुव्वा उडवला आहे. सोमवारी रात्री पार पडलेल्या या एकतर्फी लढतीत आरसीबीनं 9 गडी राखून दिल्लीवर ऐतिहासिक विजय मिळवला. ज्या खेळपट्टीवर अधिक धावा होण्याची शक्यता होती, तिथे बेंगळुरूच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजीचा पालापाचोळा केला.
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा आरसीबीचा निर्णय सार्थ ठरला. जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार या जोडीनं डावाच्या सुरुवातीलाच असा काही कहर केला की दिल्लीचे फलंदाज खेळपट्टीवर (क्रीज) टिकूच शकले नाहीत. पहिल्या तीन षटकांत दिल्लीची अवस्था 13 धावांवर 6 बाद अशी केविलवाणी झाली होती. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात खराब सुरुवातीपैकी एक मानली जात आहे. दिल्लीचा संपूर्ण संघ 16.3 षटकांत अवघ्या 75 धावांवर गारद झाला. तसेच 75 धावांच्या आता संपुर्ण संघ बाद होण्याच्या यादीत दिल्लीचा संघ दुसऱ्या (3 वेळेस) स्थानावर जावून हा निराशाजनक रेकॉर्ड सुद्धा केला आहे. दिल्लीकडून अभिषेक पोरेलनं (30 धावा) थोडा प्रतिकार केला. तो सोडता कोणत्याही फलंदाजाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही.
76 धावांचे माफक आव्हान आरसीबीनं अवघ्या 6.3 षटकांत 1 गडी गमावून पूर्ण केले आणि दिल्लीला या हंगामात सलग तिसरा पराभवाचा धक्का दिला. विराट कोहली (23*) आणि देवदत्त पडिक्कल (34*) यांनी संघाला 81 चेंडू राखून मोठा विजय मिळवून दिला. आरसीबीनं चेंडूंच्या बाबतीत मिळवलेला हा त्यांच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विजयांपैकी एक ठरला आहे.
सध्या दिल्ली 8 सामन्यांमध्ये 5 पराभव आणि 3 विजयांसह 7 व्या स्थानावर आहे. तर आरसीबीनं कालच्या विजयानं प्लेऑफचं स्थान आणखी पक्क केलं आहे. त्यांनी आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत 6 सामन्यात विजय आणि 2 सामन्यात पराभव मिळाला आहे. 12 गुणांसह 2 स्थानावर आरसीबी विराजमान आहे.

