वनडे क्रिकेटच्या इतिहासात सगळ्यात जास्त धावा झिम्बाव्बेच्या एका लीगच्या नावावर

Zimbabwe: क्रिकेट जगताला थक्क करणारा आणि आजवर अशक्य वाटणारा एक अभूतपूर्व चमत्कार झिम्बाव्बेच्या देशांतर्गत 50 षटकांच्या क्रिकेट लीगमध्ये पाहायला मिळाला आहे. ‘मासविंगो 500 ओव्हर फर्स्ट लीग’ (Masvingo 50 Over First League) स्पर्धेत खेळताना एका संघानं निर्धारित 50 षटकांत तब्बल 822 धावांचा डोंगर उभा करत विश्वविक्रम रचला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेट इतिहासात एकाच संघानं 800 धावांचा टप्पा ओलांडण्याची ही जगातील पहिलीच वेळ ठरली आहे.

हा ऐतिहासिक सामना स्कॉर्पियन्स क्रिकेट क्लब (Scorpions Cricket Club) आणि मिथेन लायन्स (Methane Lions) या दोन संघांमध्ये खेळवला गेला. स्कॉर्पियन्स क्रिकेट क्लबच्या कर्णधारानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरला. स्कॉर्पियन्सच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि 50 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 822 धावा मारल्या.

या डावात स्कॉर्पियन्स क्लबच्या दोन फलंदाजांनी ऐतिहासिक कामगिरी केली. सलामीवीर विनफेड मुतेंडे (Winfed Mutende) यानं अवघ्या 75 चेंडूंत 23 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीनं 203 धावांची झंझावाती खेळी केली. तर दुसऱ्या बाजूनं तकुंडा माडेम्बो (Takunda Madembo) यानं सर्वाधिक वेळ खेळत अवघ्या 143 चेंडूंत 50 चौकार आणि 7 षटकारांची आतिषबाजी करत तब्बल 302 धावांचं ‘त्रिशतक’ केलं.

823 धावांच्या या अशक्यप्राय लक्षाचा पाठलाग करताना मिथेन लायन्सचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. स्कॉर्पियन्सच्या भेदक गोलंदाजीसमोर मिथेन लायन्सचा संपूर्ण संघ अवघ्या 28 धावांवर ऑलआऊट झाला. स्कॉर्पियन्स क्रिकेट क्लबनं हा सामना 794 धावांच्या इतक्या मोठ्या फरकानं जिंकून क्रीडा विश्वात इतिहास घडवला.

यापूर्वीचा सर्वोच्च वनडे रेकॉर्डअधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) क्रिकेटचा विचार केल्यास, सर्वोच्च धावसंख्येचा जागतिक महाविक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडनं 2022 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध 4 गड्यांच्या मोबदल्यात 498 धावा केल्या होत्या. मात्र, देशांतर्गत आणि क्लब क्रिकेटचा समावेश केल्यास स्कॉर्पियन्स क्रिकेट क्लबनं 16.44 च्या रनरेटनं केलेल्या 822 धावा हा क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासातील सर्वोच्च मर्यादित षटकांचा स्कोअर ठरला आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.