आरसीबी पहिल्या स्थानावर; लखनऊने कुठे गमवला सामना

LSG vs RCB IPL 2026: काल (15 एप्रिल 2026) झालेल्या आयपीएलच्या 23 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघानं लखनऊ सुपर जायंट्स (LSG) वर 5 गड्यांनी सहज विजय मिळवला. हा सामना बेंगळुरूच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला गेला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊ सुपर जायंट्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सर्वबाद 146 धावा केल्या. लखनऊची फलंदाजीची सुरूवात अतिशय खराब झाली. त्यामुळे त्यांच्या धावांना लगाम लागला. तर लखनऊसाठी मिचेल मार्शनं सर्वाधिक 40 धावा (32 चेंडू) केल्या, तसेच मुकुल चौधरीनं 39 आणि आयुष बदोनीनं 38 धावांचं योगदान दिलं. बेंगळुरूच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच टिच्चून मारा केला, ज्यामध्ये रसिख सलाम डारनं सर्वाधिक 4 बळी टिपले.

प्रत्युत्तरात 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं आक्रमक सुरुवात केली. विराट कोहलीनं सर्वाधिक 49 धावा (34 चेंडू) करत विजयाचा पाया रचला, पण तो अर्धशतकापासून अवघ्या एका धावेनं मुकला. त्याला कर्णधार रजत पाटीदार (27 धावा) आणि जितेश शर्मा (23 धावा) यांनी मोलाची साथ दिली. बेंगळुरूनं हे आव्हान 15.1 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 149 धावा करून सहज पूर्ण केलं आणि 29 चेंडू राखून विजय मिळवला. या विजयामुळे सध्या आरसीबी गुणतालिकेत 8 गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

सामना कुठे फिरला?
या सामन्याचा निकाल बेंगळुरूच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे आणि आरसीबीच्या क्षेत्ररक्षकांनीही उत्तम क्षेत्ररक्षण केल्यामुळे लागला. तसेच जॉश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार यांनी पॉवरप्लेमध्येच लखनऊच्या फलंदाजांवर दबाव टाकला होता. लखनऊचा कर्णधार ऋषभ पंत हाताला दुखापत झाल्यामुळे ‘रिटायर्ड हर्ट’ झाला आणि त्यानंतर फलंदाजीला परतल्यावरही तो फक्त 1 धाव करू शकला, ज्यामुळे लखनऊला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. बेंगळुरूनं फलंदाजीमध्येही वेगवान धावा केल्यामुळे लखनऊचे गोलंदाज सामन्यावर पकड मिळवू शकले नाहीत.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.