RCB vs RR: नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल 2026 च्या कालच्या (10 एप्रिल 2026) सामन्यात राजस्थान रॉयल्सनं (RR) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) 6 गडी राखून धुव्वा उडवला आहे. हा आरसीबीचा या हंगामातील पहिला पराभव ठरला आहे. हा रोमांचक सामना गुवाहाटी येथील एसीए बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर पार पडला. या विजयामुळे राजस्थान रॉयल्सचा अजेय रथ गुवाहाटीच्या मैदानावरही कायम राहिला आहे.
कर्णधार रियान परागनं नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची सुरूवात थोडी खराब झाली होती. पण बेंगळुरूसाठी कर्णधार रजत पाटीदारनं 40 चेंडूंत 63 धावांची (4 चौकार, 4 षटकार) कर्णधारी खेळी खेळली. त्याला विराट कोहली (32 धावा) आणि इम्पॅक्ट प्लेयर व्यंकटेश अय्यर (29* धावा) यांनी मोलाची साथ दिली. या सगळ्यांच्या जोरावर आरसीबीच्या संघानं निर्धारित 20 षटकांत 7 बाद 201 धावांची मजबूत धावसंख्या उभारली.
202 धावांच्या ध्येयाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अडखळती झाली. कारण यशस्वी जयस्वाल 13 धावा करून लवकरच बाद झाला, मात्र त्यानंतर 15 वर्षीय युवा सनसनाटी वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांनी बेंगळुरूच्या गोलंदाजांना अक्षरशः रडकुंडीला आणलं. वैभव सूर्यवंशीनं फक्त 26 चेंडूंत 78 धावांची (8 चौकार, 7 षटकार) विध्वंसक खेळी केली, ज्यात त्यानं स्वत:च्याच 15 चेंडूत अर्धशतक झळकावण्याच्या रेकॉर्डची बरोबरी केली. त्याला साथ देताना ध्रुव जुरेलनं 43 चेंडूंत नाबाद 81 धावांची आपली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या केली. ज्यात त्यानं 8 चौकार आणि 3 षटकार लावले.
सामना कुठे फिरला?
राजस्थाननं पॉवरप्लेमध्येच 97 धावा कुटून या हंगामातील सर्वोच्च पॉवरप्ले धावसंख्या उभारली, ज्यामुळे बेंगळुरूचा संघ दबावाखाली आला. वैभव आणि जुरेल यांच्यातील 37 चेंडूंतील 108 धावांच्या भागीदारीनं सामन्याचं पारडं पूर्णपणे राजस्थानच्या बाजूनं झुकवलं. आणि त्यामुळे राजस्थाननं हे लक्ष्य 18 व्या षटकातच 4 गडी गमावून सहज गाठले.
सध्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स 4 सामन्यांत 4 विजयांसह 8 गुण मिळवून पहिल्या स्थानावर अजेय आहे. तर दुसरीकडं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा या हंगामातील पहिल्या पराभवानंतर बेंगळुरूचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

