KS Bharat: भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज कोना श्रीकर भरत (के. एस. भरत) यानं वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला कायमचा रामराम ठोकला आहे. काल ४ जून २०२६ रोजी भरतनं सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या या अनपेक्षित निर्णयाची माहिती दिली. त्याच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
निवृत्तीची घोषणा करताना के. एस. भरतनं लिहिलं, “अत्यंत अभिमानास्पद मन आणि कृतज्ञतेच्या भावनेनं, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेत आहे. माझ्या देशासाठी पांढरा शर्ट घालणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान राहिला आहे”. त्यानं पुढं लिहिलं की, “चार जणांच्या आमच्या कुटुंबात आम्ही सर्वांनी मिळून एकाच स्वप्नाचा ध्यास घेतला होता आणि ते पूर्ण झालं.”
Wicketkeeper-batter KS Bharat who represented India in 7 Test matches, has announced his retirement from international cricket at the age of 32 🙏#KSBharat #TeamIndia #Cricket pic.twitter.com/KH4oRmzzg2
— CricketTimes.com (@CricketTimesHQ) June 5, 2026
के. एस. भरतनं फेब्रुवारी २०२३ मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान नागपूर येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. ऋषभ पंतच्या अपघातानंतर त्याला भारतीय कसोटी संघात मुख्य यष्टीरक्षक (विकेटकीपर) म्हणून संधी मिळाली होती. त्यानं भारतासाठी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना फेब्रुवारी २०२४ मध्ये विशाखापट्टनम येथे इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्यानंतर ध्रुव जुरेलच्या आगमनामुळे आणि खराब फॉर्मामुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते.
त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फक्त कसोटी फॉरमॅटपुरती मर्यादित राहिली. त्यानं भारतासाठी एकूण ७ कसोटी सामने खेळताना २०.०९ च्या सरासरीने २२१ धावा केल्या, ज्यामध्ये ४४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. एक यष्टीरक्षक म्हणून त्यानं यष्टीमागे १९ बळी (१८ झेल आणि १ स्टम्पिंग) टिपले. तो २०२३ च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यातही भारतीय संघाचा भाग होता.

