“एकतर खेळा नाहीतर निवृत्त व्हा…”; धोनीच्या भूमिकेवर आर. अश्विनचे मोठे विधान!

IPL 2026 Dhoni: आयपीएल 2026 च्या हंगामापूर्वी, चाहत्यांचे डोळे पुन्हा एकदा ‘थाला’ म्हणजेच एमएस धोनीकडे लागले आहेत. कारण धोनी या हंगामात नेमका कशा प्रकारे खेळणार, यावर चर्चा रंगली असतानाच भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यानं चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेबाबत एक अत्यंत स्पष्ट मत मांडलं आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलवरील ‘Ash की बात’ या कार्यक्रमात बोलताना अश्विननं सांगितलं की, धोनीनं ‘इम्पॅक्ट प्लेयर’ (Impact Player) म्हणून खेळण्याऐवजी थेट अंतिम 11 (Playing XI) मध्ये असावं, अन्यथा त्यानं पूर्ण हंगाम खेळू नये.

अश्विन नक्की काय म्हणाला?
अश्विननं आपल्या विधानात धोनीच्या तयारीचा उल्लेख केला. तो म्हणाला की, “जर तुम्ही सीएसकेची प्लेइंग इलेव्हन निवडत असाल आणि संघात धोनी असेल, तर तिथं चर्चेला जागाच उरत नाही. त्याला प्लेइंग 11 मध्ये खेळावेच लागेल. मी त्याला फक्त इम्पॅक्ट प्लेयरच्या यादीत पाहण्यास सहमत नाही”.

“जर धोनीला खेळायचं नसतं, तर तो स्वतःहून निवृत्त झाला असता. तो गेल्या तीन महिन्यांपासून रांचीमध्ये जोरदार सराव करत आहे. हा सरावच सांगतोय की त्याला पूर्ण क्षमतेने खेळायची इच्छा आहे. जर तो मैदानात उतरणार असेल, तर त्याला कोणीही ‘तू खेळू शकत नाहीस’ असं सांगू शकत नाही”. असही तो (आर.अश्विन) पुढे म्हणाला.

धोनीची नवीन ‘दुहेरी भूमिका’
अश्विन धोनीच्या फलंदाजीच्या क्रमावरही बोलला आहे. तो म्हणाला की, धोनी आता कदाचित पहिल्या सहा फलंदाजांपैकी नसेल, तरीही तो संघात दोन महत्त्वाच्या भूमिका पार पाडू शकतो. जसे की,

  1. यष्टीरक्षक म्हणून खेळतानाच धोनी कर्णधार ऋतुराज गायकवाडला मार्गदर्शनही करू शकतो.
  2. फिनिशर आणि मेंटॉर- नवीन गोलंदाजांना मैदानावर सांभाळणे आणि अखेरच्या षटकांत मोठे फटके मारणे यात धोनीचा हात कोणीही धरू शकत नाही.

यापूर्वी एबी डीव्हिलियर्स यानं संजू सॅमसनच्या आगमनानंतर धोनीच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, अश्विननं हे दावे फेटाळून लावत धोनीची उपस्थिती संघासाठी ‘नॉन-नेगोशिएबल’ असल्याचं म्हटलं आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.