IPL 2026 CSK: आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज नेथन इलिस हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर पडला. त्यामुळे संघासमोर हा प्रश्न होता की, त्याची (नेथन इलिस) जागा कोणाला द्यायची. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार, चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाने दुखापतग्रस्त नेथन इलिसच्या जागी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज स्पेंसर जॉन्सन (Spencer Johnson) याची निवड केली आहे.
मागील अनुभव
स्पेंसर जॉन्सन याआधीही आयपीएल खेळला आहे. त्यानं गुजरात टायटन्स (2024) आणि कोलकत्ता नाईट रायडर्स (2025) या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र, मागील हंगामात पाठीच्या दुखापतीमुळे त्याला काही काळ मैदानाबाहेर राहावं लागलं होतं.
तसेच स्पेंसर जॉन्सन हा ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तो ताशी 140 ते 145 किलोमीटरहून अधिक वेगानं गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. त्याच्या वेगामुळे आणि डावखुऱ्या हाताच्या अँगलमुळे तो फलंदाजांसाठी घातक ठरू शकतो. जॉन्सनला अंदाजे 1.5 कोटी रुपयांच्या किमतीत संघानं करारबद्ध केलं असून, तो नेथन इलिसची कमतरता भरून काढेल अशी संघाला आशा आहे.
पीएसएलला(PSL) नकार देऊन आयपीएलमध्ये आगमन
स्पेंसर जॉन्सननं या हंगामात पाकिस्तान सुपर लीग (PSL 2026) मधून माघार घेऊन आयपीएलमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. पीएसएलमध्ये तो क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाशी करारबद्ध होता, मात्र वैयक्तिक कारणांचं (आणि आयपीएलमधील संधीचं) कारण देत त्यानं तिथं खेळण्यास नकार दिला आणि सीएसकेच्या ताफ्यात सामील झाला आहे.
सीएसकेचा पहिला सामना
चेन्नई सुपर किंग्स आपला 2026 चा पहिला सामना 30 मार्च 2026 रोजी राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध खेळणार आहे. हा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल.

