SRH vs GT IPL 2026: काल (12 मे 2026) झालेल्या आयपीएल (IPL 2026) च्या 56 व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) संघानं सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध 82 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गुजरात टायटन्सनं पहिली फलंदाजी केली. सुरुवातीला कर्णधार शुभमन गिल (5) आणि जोस बटलर (7) स्वस्तात बाद झाल्यामुळे गुजरातची स्थिती बिकट झाली होती. मात्र, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी डाव सावरला. निर्धारित 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात गुजरातनं 168 धावा उभारल्या आणि हैदराबादसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं.
प्रत्युत्तरात 169 धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. गुजरातच्या आक्रमक गोलंदाजीसमोर हैदराबादचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. महम्मद सिराजनं पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडला शून्य धावावर बाद करून हैदराबादला मोठा धक्का दिला. कर्णधार पॅट कमिन्सनं सर्वाधिक (19) धावा केल्या. संपूर्ण संघ 14.5 षटकांत अवघ्या 86 धावांवर ऑलआऊट झाला.
गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शन यानं सर्वाधिक धावा केल्या. त्यानं 44 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तसेच वॉशिंग्टन सुंदरनं 33 चेंडूंत 50 धावांचं योगदान दिलं. गोलंदाजीत गुजरातच्या कगिसो रबाडानं 4 षटकांत 28 धावा देऊन 3 महत्त्वाचे बळी घेतले आणि तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. जेसन होल्डरनंही 20 धावांत 3 बळी टिपले.
हैदराबाद कुठे हरली?
हैदराबादनं हा सामना त्यांच्या फलंदाजीमुळे गमावला. पॉवरप्लेच्या सुरुवातीलाच 32 धावांवर त्यांचे 4 मुख्य फलंदाज (ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि स्मरण रविचंद्रन) बाद झाले. खेळपट्टी फिरकी आणि वेगवान गोलंदाजांना पूरक असताना फलंदाजांनी बेजबाबदार फटके मारल्यामुळे त्यांनी सामना गमावला.
कालच्या सामन्यातील काही रेकॉर्ड्स
86 धावा हा सनरायझर्स हैदराबादच्या आयपीएल इतिहासातील सर्वात कमी (lowest score) स्कोअर ठरला.
86 धावा हा चालू आयपीएल 2026 च्या हंगामातील कोणत्याही संघाचा सर्वात लहान स्कोअर ठरला.
साई सुदर्शननं या खेळीदरम्यान चालू हंगामातील आपल्या 500 धावा पूर्ण करण्याचा टप्पा ओलांडला.

