15 वर्षाच्या वैभवने ख्रिस गेलचा १४ वर्षे जुना महाविक्रम काढला मोडीत

Vaibhav Suryawanshi: बुधवारी (27 मे) झालेल्या न्यू चंदिगढ येथील महाराजा यादविंद्र सिंग स्टेडियमवर आयपीएल 2026 च्या रोमहर्षक ‘एलिमिनेटर’ (Eliminator) सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) संघानं सनरायझर्स हैदराबादचा (SRH) 47 धावांनी पराभव केला. या सामन्यात राजस्थानच्या 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीनं (Vaibhav Sooryavanshi) वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेलचा (Chris Gayle) तब्बल 14 वर्षे जुना ऐतिहासिक विक्रम मोडीत काढला आहे.

काय होता तो विक्रम?
ख्रिस गेलनं 2012 च्या आयपीएल हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून खेळताना एकाच हंगामात सर्वाधिक (59) षटकार ठोकण्याचा विक्रम रचला होता. काल वैभव सूर्यवंशीनं अवघ्या 29 चेंडूंत 12 उत्तुंग षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीनं 97 धावांची विध्वंसक खेळी खेळली. या वादळी खेळीदरम्यान त्यानं चालू हंगामातील आपले 65 षटकार पूर्ण करून ख्रिस गेलचा हा 14 वर्षे जुना ‘सिक्सर किंग’चा विक्रम मोडीत काढला. तसेच वैभव अवघ्या 3 धावांनी ख्रिस गेलच्या सर्वात जलद (30 चेंडू) आयपीएल शतकाचा विक्रम मोडण्यापासून मुकला आहे.

असा मिवळला राजस्थानने विजय
सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो राजस्थानच्या फलंदाजांनी मोडून काढला. वैभवच्या आक्रमक 97 धावा आणि ध्रुव जुरेलच्या झुंझावाती 50 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 243 धावांचा अजस्त्र डोंगर उभा केला. 244 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ 19.2 षटकांत अवघ्या 196 धावांवर ऑलआऊट झाला. हैदराबादकडून नितीश कुमार रेड्डीनं सर्वाधिक 38 धावा केल्या. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरनं 3 आणि रवींद्र जडेजानं 2 बळी घेत हैदराबादचे कंबरडे मोडले आणि संघाला 47 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला.

या ऐतिहासिक विजयासह राजस्थान रॉयल्सनं क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली असून, आता फायनलच्या तिकिटासाठी शुक्रवारी त्यांची लढत गुजरात टायटन्सविरुद्ध होईल.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.