CSK vs KKR IPL 2026: काल (14 एप्रिल 2026) रोजी झालेल्या आयपीएलच्या 22 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघानं कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) वर 32 धावांनी विजय मिळवला. हा रोमांचक सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एम. ए. चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे खेळवला गेला. सीएसकेचा हा या हंगामातील सलग दुसरा विजय मिळवला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या घरच्या मैदानावर सीएसकेचा पराभव होत होता त्याच मैदानावर आता विजय मिळायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे सीएसकेच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
कोलकत्ता नाईट रायडर्सनं नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 बाद 192 धावांचा भक्कम स्कोअर उभारला. चेन्नईकडून संजू सॅमसननं सर्वाधिक 48 धावा (32 चेंडू) केल्या, तर डेवाल्ड ब्रेविसनं 41 धावांची साथ दिली. युवा खेळाडू आयुष म्हात्रेनं फक्त 17 चेंडूंत 38 धावांची स्फोटक खेळी करत संघाला वेगवान सुरुवात करून दिली होती.
193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकत्ता नाईट रायडर्सची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्येच त्यांनी महत्त्वाचे बळी गमावले. मध्य फळीतील फलंदाजांनाही म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. रमनदीप सिंगनं 35 धावा आणि रोव्हमन पॉवेलनं नाबाद 31 धावा करून सामना सावरण्याचा प्रयत्न केला, पण चेन्नईच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर त्यांना 20 षटकांत 7 बाद 160 धावांपर्यंतच मजल मारता आली. चेन्नईचा फिरकीपटू नूर अहमद यानं फक्त 21 धावा देत 3 बळी टिपले आणि कोलकत्त्याच्या फलंदाजीचा कणा मोडला.
हा सामना पॉवरप्लेमध्येच चेन्नईच्या बाजूनं झुकला होता. चेन्नईनं आपल्या पॉवरप्लेमध्ये 72 धावा कुटल्या होत्या, तर कोलकत्त्याला फक्त 36 धावाच करता आल्या. तसेच, नूर अहमदच्या प्रभावी स्पेलमुळे कोलकत्त्याला मध्यंतरीच्या षटकांत मोठी भागीदारी करता आली नाही. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि कॅमरन ग्रीन यांच्या एकापाठोपाठ एक विकेट गेल्यानं सामना पुर्णपणे केकेआरच्या हातातून निसटला.
या विजयामुळे चेन्नईनं सलग दुसरा विजय नोंदवला असून 4 गुण मिळवले आहेत. सध्या गुणतालिकेत (Point Table) सीएसके 8 व्या स्थानावर आहेत. तर दुसरीकडं कोलकत्त्याला अद्याप या हंगामात एकही विजय मिळवता आला नाही. केकेआर 1 गुणासह (पंजाबविरूद्धचा सामना अनिर्णित) शेवटच्या स्थानावर आहे.

