Badminton Asia Championships 2026: भारतीय बॅडमिंटनचा उगवता तारा आयुष शेट्टी यानं ‘बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2026’ मध्ये आपल्या जिद्दी खेळानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र, रविवारी 12 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात त्याला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या चीनच्या शी युकीकडून पराभव पत्करावा लागला. चीनच्या निंगबो ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटरमध्ये रंगलेल्या या चुरशीच्या लढतीत अनुभवी शी युकीने आयुषचा 21-15, 21-13 अशा सरळ गेममध्ये पराभव केला. या पराभवामुळे आयुषचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं असलं, तरी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा तो गेल्या अनेक वर्षांतील पहिला युवा भारतीय खेळाडू ठरला आहे.
सुमारे 48 मिनिटे चाललेल्या या अंतिम सामन्याच्या पहिल्या गेममध्ये आयुषनं शी युकीला जोरदार टक्कर दिली आणि सुरुवातीला 10-9 अशी निसटती आघाडीही घेतली होती. मात्र, मध्यांतरानंतर शी युकीनं आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत सलग गुण वसूल केले आणि पहिला गेम 21-15 ने जिंकला. दुसऱ्या गेममध्ये चिनी खेळाडूनं सुरुवातीपासूनच वर्चस्व राखलं. आयुषनं काही उत्कृष्ट स्मॅशेस मारून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण शी युकीच्या अभेद्य बचावासमोर त्याचे प्रयत्न तोकडे पडले आणि दुसरा गेम 21-13 ने गमावत त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
या स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा विचार केल्यास, आयुष शेट्टी हा अंतिम फेरीपर्यंत मजल मारणारा एकमेव भारतीय ठरला. लक्ष सेन आणि एच.एस. प्रणॉय, महिला एकेरीत पी.व्ही. सिंधू हे सगळे स्पर्धेच्या काही सामन्यातच स्पर्धेतून बाहेर पडाले, तर सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. तन्वी पत्री आणि अनमोल खरब या युवा खेळाडूंनीही उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारून आश्वासक खेळ दाखवला.
या स्पर्धेतील यशानंतर आयुष शेट्टीचं आता पुढचं मुख्य ध्येय आगामी ‘थॉमस कप’ आणि त्यानंतर होणारी ‘बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप’ आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्यामुळे आयुष आता जागतिक क्रमवारीत पहिल्या 20 खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याच्या जवळ पोहोचला आहे. ऑलिम्पिक पात्रतेच्या दृष्टीनं ही कामगिरी त्याच्यासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. भारतीय बॅडमिंटन चाहत्यांना आता आयुषकडून भविष्यात मोठ्या जेतेपदांची अपेक्षा आहे.
आणखी हेही वाचा
जॅनिक सिनरचे मॉन्टे कार्लो मास्टर्सवर वर्चस्व; कार्लोस अल्काराजचा धुव्वा उडवत पटकावले विजेतेपद- https://agcsport.tv/tennis/janik-sinner-dominates-monte-carlo-masters/
आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप: आयुष शेट्टीचा विजय; सिंधू आणि प्रणॉय बाहेर!-https://agcsport.tv/other/asian-badminton-championships-aayush-shetty-wins-sindhu-and-prannoy-out/

