आयुष शेट्टीने जागतिक विजेत्याला नमवलं; असं करणारा पहिला भारतीय खेळाडू

Badminton Asia Championships 2026: चीनमधील निंगबो येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारतीय युवा खेळाडू आयुष शेट्टीनं आपली ऐतिहासिक विजयी घोडदौड कायम राखत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत (Semi-finals) धडक मारली आहे. या विजयामुळे भारताचं या स्पर्धेतील किमान कांस्य पदक आता निश्चित झालं असून, आयुषनं 21 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरण्याचा मान मिळवला आहे.

चीनच्या निंगबो ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटरमध्ये 7 ते 12 एप्रिल 2026 या कालावधीत ही प्रतिष्ठेची आशियाई स्पर्धा रंगली आहे. स्पर्धेत भारताचे अनेक दिग्गज खेळाडू (पी.व्ही. सिंधू, एच.एस. प्रणॉय, लक्ष्य सेन) पहिल्या दोन फेऱ्यांतच बाहेर पडले असताना, 20 वर्षीय आयुष शेट्टीनं एकट्यानं भारताची धुरा सांभाळली आहे.

आयुषनं शुक्रवारी (10 एप्रिल 2026) झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या (Quarter-finals) सामन्यात इंडोनेशियाच्या तगड्या खेळाडू आणि 2024 च्या ऑल इंग्लंड विजेत्या जोनाथन क्रिस्टी (Jonatan Christie) याचा 23-21, 21-17 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत 25 व्या स्थानी असलेल्या आयुषनं जगातील 4 थ्या क्रमांकाच्या क्रिस्टीला आपल्या वेगवान स्मॅशेस आणि नेटवरील चपळ हालचालींच्या जोरावर 54 मिनिटांत धूळ चारली.

यापूर्वी, आयुषनं पहिल्या फेरीत चीनच्या जागतिक 7 व्या क्रमांकाच्या ली शी फेंग याचा 21-13, 21-16 असा पराभव करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर दुसऱ्या फेरीत त्यानं चिनी तैपेईच्या ची यू जेन (Chi Yu Jen) याला 21-16, 21-12 असं नमवून अंतिम आठमध्ये स्थान मिळवलं होतं.

आता संपूर्ण देशाचं लक्ष आयुष शेट्टीच्या आजच्या (11 एप्रिल 2026) होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याकडं लागलं आहे. या सामन्यात त्याचा सामना थायलंडच्या जागतिक विजेत्या कुनलावट वितिदसर्ण याच्याशी होणार आहे. कुनलावट हा पॅरिस ऑलिम्पिकचा रौप्य पदक विजेता असून आयुषसाठी हे आतापर्यंतचं सर्वात मोठं आव्हान असेल. जर आयुषनं हा सामना जिंकला, तर तो आशियाई चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा दिनेश खन्ना यांच्यानंतरचा पहिला भारतीय ठरेल.

इतर भारतीय खेळाडूंची स्थिती
या स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांना उप-उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला, तर लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत पहिल्याच फेरीत बाहेर पडले. सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली होती, त्यामुळे आता संपूर्ण देशाचं लक्ष फक्त आयुषच्या सुवर्ण कामगिरीकडं लागलं आहे

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.