Sajan prakash: भारताचा अनुभवी जलतरणपटू साजन प्रकाश यानं सिंगापूर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये आपली छाप पाडली आहे. रविवारी (22 मार्च) झालेल्या ५६ व्या ‘सिंगापूर नॅशनल एज ग्रुप स्विमिंग चॅम्पियनशिप’मध्ये चमकदार कामगिरी करत रौप्य पदक (Silver Medal) पटकावलं आहे. त्यानं 200 मीटर बटरफ्लाय प्रकाराच्या या (रौप्य) पदकावर नाव कोरलं आहे. ओसीबीसी (OCBC) ॲक्वेटिक सेंटरमध्ये पार पडलेल्या या अटीतटीच्या लढतीत साजननं सुरुवातीपासूनच वेग राखून पदकापर्यंत मजल मारली.
सामन्याचा निकाल
साजन प्रकाशनं अंतिम फेरीत कडवी झुंज दिली, मात्र त्याला चीनच्या तैपेईच्या (Chinese Taipei) कुआन हुंग-वांग (Kuan Hung-Wang) याच्याकडून पराभव पत्करावा लागला. कुआनने 1:56.18 सेकंद वेळेसह सुवर्ण पदक जिंकलं. तर साजन प्रकाशनं ही शर्यत जिंकायला 1:57.09 सेकंदाची वेळ लागली. आणि त्याला दुसऱ्या स्थानावर रौप्य मिळवून समाधान मानावं लागलं.
या स्पर्धेचा फायदा काय आहे?
या पदकाव्यतिरिक्त साजन प्रकाशसाठी या स्पर्धेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यानं कॉमनवेल्थ गेम्स (CWG) 2026 साठीचं पात्रता मानक (Qualification Standard) यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. भारतीय जलतरण महासंघानं (SFI) या स्पर्धेसाठी १:५७.१२ सेकंदाची वेळ निश्चित केली होती, जी साजनने 1:57.09 सेकंदात पूर्ण करून पार केली. या कामगिरीमुळे त्याचं आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीचं स्थान अधिक मजबूत झालं आहे.
साजन प्रकाश आता या यशानंतर आगामी आशियाई आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतर महत्त्वाच्या स्पर्धांसाठी तयारी करणार आहे. सद्यस्थितीत तो विजयनगर येथील ‘इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स’ (IIS) मध्ये सराव करत असून, तिथं त्याला अत्यंत स्थिर आणि चांगलं वातावरण मिळत असल्याचं त्यानं सांगितलं आहे.

