maharashtra kesari 2026: पुण्यातील वाघोली येथील स्व. अजितदादा पवार क्रीडानगरीत सुरू असलेल्या 68 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आजचा चौथा दिवस (२१ मार्च २०२६) अत्यंत निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. आजच्या दिवशी दिग्गज मल्लांच्या चुरशीच्या लढती होणार असून, अनेक वजन गटांतील उपांत्य (Semi-finals) आणि अंतिम फेऱ्यांचा थरार पाहायला मिळणार आहे.
महाराष्ट्रातील कुस्तीचा सर्वात मोठा उत्सव ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा आज चौथा दिवस आहे. सकाळी 9 वाजल्यापासून विविध वजन गटांतील साखळी, उपांत्यपूर्व (Quarter-finals) आणि उपांत्य फेऱ्यांचे सामने सुरू झाले असून, सायंकाळी 7 वाजेनंतर काही वजनी गटांतील लढती पार पडेल.
गादी विभागातील प्रमुख मल्लांची कामगिरी
दोनवेळचा महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षे यानं आपल्या अनुभवाच्या जोरावर पुण्याच्या प्रतीक जगतापचा 10-0 असा तांत्रिक गुणांवर पराभव करून उपांत्य फेरीत (Semifinal) धडक मारली आहे. गेल्या वर्षीचा (६७ वा) महाराष्ट्र केसरी विजेता पृथ्वीराज मोहोळ यानं जालन्याच्या अरुण चलावडेला 10-0 नं नमवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. तो आता उपांत्य फेरीतील लढतीसाठी सज्ज आहे. माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यानंही गादी विभागातून प्रतिस्पर्ध्याला धोबीपछाड देत पुढची फेरी गाठली आहे. तसेच पुण्याच्या ओंकार निगडे आणि नाशिकच्या शुभम अचपाले यांनी देखील आपापल्या लढती जिंकून पुढच्या फेरीत स्थान मिळवलं आहे.
माती विभागातील प्रमुख मल्लांची कामगिरी
या स्पर्धेतील सर्वात मोठा दावेदार मानल्या जाणाऱ्या सिकंदर शेखनं आपल्या ताकदीच्या जोरावर उपांत्यपूर्व फेरीत (Quarter-finals) प्रवेश केला आहे. त्यानं दुसऱ्या फेरीत नाशिकच्या मनिष रायतेवर 8-2 अशा गुणांनी मात करून आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. आज तो उपांत्य फेरीतील (Semifinal) लढतीसाठी मैदानात उतरेल. उपमहाराष्ट्र केसरी राहिलेल्या महेंद्र गायकवाडनेही माती विभागातून प्रतिस्पर्धी मल्लाचा 10-0 असा एकतर्फी पराभव करून पुढची फेरी गाठली आहे. पहिल्या फेरीत माऊली जमदाडेला पराभूत करून खळबळ उडवून देणाऱ्या बाळू बोडकेला आपली लय कायम राखता आली नाही. त्याला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. गडचिरोलीच्या विक्रमसिंह भोसलेने चुरशीच्या लढतीत बाळू बोडकेचा 4-1 असा पराभव केला.
महाराष्ट्र केसरीच्या यंदाच्या या स्पर्धेत शिवराज राक्षे, सिकंदर शेख, पृथ्वीराज पाटील, पृथ्वीराज मोहोळ आणि हर्षवर्धन सदगीर या गतविजेत्यांनी आपली छाप पाडत तिसऱ्या फेरीत स्थान मिळवले आहे. यामुळे आगामी फेऱ्यांमध्ये आणखी चुरशीच्या लढती पाहायला मिळणार, हे निश्चित झाले आहे.
या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा २२ मार्च २०२६ रोजी होणार असून, त्यादिवशी ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची मुख्य लढत पार पडेल.

