68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नावाजलेल्या अनेक मल्लांचा पराभव

Maharashtra Kesari 2026: महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचा मानबिंदू असलेली ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुण्यातील वाघोली येथे दिमाखात पार पडत आहे. पण अनेक दिग्गज मल्लांच्या अनपेक्षित पराभवामुळे स्पर्धा चांगलीच चुरशीची चालू आहे असं दिसून येत आहे. तसेच सुरू असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तरुण मल्लांनी दिग्गजांना जोरदार आव्हान देत स्पर्धेची रंगत वाढवली आहे.

यंदाची ही स्पर्धा 68वी आवृत्ती असून 18 ते 22 मार्चदरम्यान पार पडत आहे. राज्यभरातून 850 हून अधिक मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले आहेत, त्यामुळे प्रत्येक फेरीत अत्यंत चुरशीचे सामने पाहायला मिळत आहेत.

अनपेक्षित असलेला पराभव
सर्वात मोठा धक्का मातीतील कुस्ती प्रकारात पाहायला मिळाला. अनुभवी आणि प्रबळ दावेदार मानला जाणारा माऊली जमदाडे याचा पहिल्याच फेरीत बाळू बोडकेने पराभव करत स्पर्धेबाहेर काढले. त्यामुळे त्याचं यंदाच्या हंगामातील प्रवास इथेच संपुष्टात आला आहे. आणि हा सामना या स्पर्धेतील सर्वात मोठ्या उलटफेरांपैकी एक मानला जात आहे.

या उलटफेरीमुळे मातीतील गटात स्पर्धा अधिकच खुली झाली आहे. पारंपरिक कुस्तीमध्ये अनुभवी पैलवानांना मागे टाकत नव्या खेळाडूंनी आपली ताकद दाखवली आहे.

या स्पर्धेत विविध वजन गटांमध्ये सामने खेळवले जात आहेत. विशेषतः ५७ किलो आणि ८६ किलो या महत्त्वाच्या वजन गटांतील सामन्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले आहे.

आणखी कोणचा पराभव झाला?
माती विभाग (Mud Category)
: कोल्हापूरचा दिग्गज पैलवान सुदर्शन पाटील (५७ किलो) याचा पुण्याच्या ओंकार निगडेने ७-० असा एकतर्फी पराभव करून त्याला स्पर्धेबाहेर काढले. तसेच सोलापूरच्या अजय निंबाळकरचा मृणाल पाटीलने ५-१ ने पराभव केला. ८६ किलो गटात जय जाधव याला मसिद शेखने १०-० अशा तांत्रिक गुणांवर धूळ चारली. सातारा जिल्ह्याचा तगडा मल्ल विशाल कोकरे याचा पुण्याच्या चंद्रहार नराळेने ४-२ ने पराभव करत त्याचा यावर्षीचा प्रवास संपवला.

गादी विभाग (Mat Category): गादी विभागातील ५७ किलो वजनी गटात कल्याणचा विनायक भोईर हा राष्ट्रीय मल्ल अक्षय ढेरेकडून १३-२ ने पराभूत झाला. साताऱ्याचा साहिल गोफणे याला नाशिकच्या शुभम अचपालेने १०-२ ने हरवून स्पर्धेतून बाहेर केले.

महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार म्हणून कोणाकडे पाहिलं जात आहे?
दरम्यान, सिकंदर शेख, पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांसारख्या पैलवानांनी विजयी सलामी देत पुढील फेरीत प्रवेश केला आहे. त्यांच्या कामगिरीमुळे ते यंदाच्या किताबाचे प्रबळ दावेदार म्हणून पुढे आले आहेत.

स्पर्धेची पुढील फेरी आता अधिकच रंगतदार होणार आहे. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेऱ्यांमध्ये सर्वोत्तम मल्ल आमनेसामने येणार असून महाराष्ट्र केसरी किताबासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.