FIDE Women’s Candidates Tournament: भारताची अनुभवी बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिच्या निर्णयामुळे बुद्धिबळ विश्वाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. 28 मार्चपासून सायप्रसमध्ये सुरू होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या ‘फिडे महिला कँडिडेट्स’ स्पर्धेतून तिनं आपलं नाव मागं घेतलं आहे . पश्चिम आशियातील इराण-इस्रायल संघर्ष आणि सायप्रसवर अलीकडेच झालेला ड्रोन हल्ला यामुळे तिनं हा कठीण निर्णय घेतला आहे.
तिची प्रतिक्रिया काय आहे?
कोनेरू हम्पीनं आयोजकांच्या आश्वासनांनंतरही आपल्या वैयक्तिक सुरक्षिततेबद्दल शंका व्यक्त केली आहे. आपल्या निवेदनात ती म्हणाली की, “गहन विचार केल्यानंतर मी हा कठीण निर्णय घेतला आहे. कोणतीही स्पर्धा, मग ती कितीही महत्त्वाची का असेना, ती माझ्या वैयक्तिक सुरक्षिततेपेक्षा आणि आरोग्यापेक्षा मोठी नाही. सध्याच्या परिस्थितीत मला तिथं पूर्णपणे सुरक्षित वाटत नाही. हा निर्णय वेदनादायी असला तरी तो आवश्यक होता आणि मी त्यावर ठाम आहे”.
तिनं पुढे नमूद केलं की, जागतिक दर्जाच्या स्पर्धा अशा तणावपूर्ण वातावरणात भरवण्याची गरज नव्हती आणि 10-20 टक्के धोका असताना जोखीम पत्करणं तिला योग्य वाटले नाही. म्हणून तिनं या स्पर्धेतून माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
फिडेचा नियम काय सांगतो?
फिडेच्या नियमांनुसार, जर एखादा खेळाडू स्पर्धेतून माघार घेतो, तर त्याची जागा त्या विशिष्ट पात्रता मालिकेतील (Women’s Events Series 2024-25) पुढील सर्वोच्च मानांकित खेळाडूला दिली जाते. त्यामुळे कोनेरू हम्पीच्या जागी आता युक्रेनची ग्रँडमास्टर अँना मुझीचूक (Anna Muzychuk) ही स्पर्धेत सहभागी होणार असल्याच सांगितलं जात आहे.
नवीन खेळाडू फक्त माघार घेतलेल्या खेळाडूची जागा घेतो, स्पर्धेचे उर्वरित सामने आणि जोड्या (Pairings) तशाच राहतात.

