India Football: भारतीय महिला फुटबॉलला जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळाली असून, फुटबॉलची जागतिक नियामक संस्था ‘फिफा’नं (FIFA) आपल्या ‘महिला विकास कार्यक्रम 2026’ (वाणिज्यिक रणनीती) साठी भारताची निवड केली आहे. या विशेष कार्यक्रमासाठी जगभरातून फक्त 12 देशांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये भारताचा समावेश होणं ही देशातील फुटबॉल क्षेत्रासाठी गौरवास्पद बाब मानली जात आहे.
फिफानं या कार्यक्रमासाठी भारतासह जर्मनी, नेदरलँड्स, स्वीडन, कॅनडा आणि मेक्सिको यांसारख्या फुटबॉलमधील दिग्गज देशांची निवड केली आहे. याशिवाय स्कॉटलंड, फिनलँड, घाना, जॉर्डन, लिथुआनिया आणि पॅराग्वे या देशांचाही यात समावेश आहे. 22 एप्रिल 2026 रोजी फिफानं ही अधिकृत घोषणा केली. अखिल भारतीय फुटबॉल महासंघानं (AIFF) महिला फुटबॉलच्या व्यावसायिक वाढीसाठी मांडलेल्या आराखड्याची दखल घेत फिफानं ही निवड केली आहे.
हा कार्यक्रम मे ते ऑक्टोबर 2026 या सहा महिन्यांच्या कालावधीत ऑनलाइन पद्धतीनं राबवला जाणार आहे. यामध्ये महिला फुटबॉल क्लबना व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करणं, प्रायोजक मिळवण्यासाठी धोरणे आखणे आणि प्रेक्षक संख्या कशी वाढवता येईल, याचं तांत्रिक मार्गदर्शन फिफाच्या तज्ज्ञांकडून दिलं जाईल. याचा थेट फायदा भारतातील महिला फुटबॉल लीग (IWL) आणि सहभागी क्लबना होणार आहे.
काय म्हणाले एम. सत्यनारायण?
या यशावर भाष्य करताना एआयएफएफचे उपमहासचिव एम. सत्यनारायण म्हणाले, “भारतातील महिला फुटबॉल सध्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात असून, त्याला व्यावसायिक बळ मिळण्याची हीच योग्य वेळ आहे. आपल्या सर्व वयोगटातील महिला संघांनी आशियाई स्तरावर आपली ताकद सिद्ध केली आहे. फिफाच्या या मार्गदर्शनामुळे आपल्या क्लबना स्वतःचे ब्रँडिंग करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मोठी मदत मिळेल.”
फिफाच्या या पुढाकारामुळे आगामी काळात भारतातील महिला फुटबॉलचा दर्जा उंचावण्यास आणि अधिक व्यावसायिक गुंतवणूक आकर्षित करण्यास निश्चितच मदत होईल.
आणखी हेही वाचा
ज्युनिअर वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ७ पदकांसह भारताचा दबदबा-https://agcsport.tv/other/india-dominates-junior-world-cup-with-7-medals-so-far/

