वरंजाका बांजा (सर्बिया): भारतीय बुद्धिबळातील उदयोन्मुख तारा ए.एस. शरवानिका (A.S. Sharvaanica) हिनं सर्बियामध्ये सुरू असलेल्या ‘फिडे वर्ल्ड कॅडेट रॅपिड आणि ब्लिट्झ चॅम्पियनशिप 2026’ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अवघ्या 11 वर्षांच्या शरवानिकानं वयानं मोठ्या गटात (अंडर-12) खेळताना आपल्या प्रतिभेनं जगाला थक्क केलं आणि फिडे वर्ल्ड रॅपिड अंडर-12 गर्ल्स चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावलं. विशेष म्हणजे, तिनं दोन फेऱ्या शिल्लक असतानाच सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे.
ही स्पर्धा 14 ते 21 एप्रिल 2026 दरम्यान सर्बियातील वरंजाका बांजा येथे पार पडत आहे. शरवानिकानं या 11 फेऱ्यांच्या स्पर्धेत पूर्ण वर्चस्व गाजवलं. तिनं एकूण 10 विजय मिळवले आणि फक्त एक सामना (युक्रेनच्या दारिया क्रावचुकविरुद्ध) बरोबरीत सोडवला. 9 व्या फेरीत तिनं आपल्यापेक्षा जास्त रेटिंग असलेल्या स्लोव्हेनियाच्या एमा जाक्सा (Ema Jaksa) हिचा पराभव करून जेतेपद निश्चित केलं. 10.5 गुणांसह तिनं ही स्पर्धा जिंकली, तर कझाकस्तानची झान्साया शोलपानबेक 7.5 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली.
शरवानिकाचं या स्पर्धेतील हे पहिले पदक नाही तर हे तिचं दुसरं जागतिक विजेतेपद आहे. यापूर्वी 2025 तिनं कझाकस्तानमध्ये झालेल्या फिडे वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये अंडर-१० मुलींच्या गटात सुवर्णपदक जिंकलं होतं. तर 2024 मध्ये तिनं नऊ वर्षांची असताना ब्लिट्झ प्रकारातही जागतिक विजेतेपद मिळवलं होतं.
शरवानिका ही तामिळनाडूच्या अरियालुर जिल्ह्यातील उदयारपालयम येथील रहिवासी आहे. ती ‘वुमन कॅन्डिडेट मास्टर’ (WCM) असून तिचं सुरुवातीचं प्रशिक्षण ग्रँडमास्टर विष्णू प्रसन्न (ज्यांनी डी. गुकेशलाही प्रशिक्षण दिलं आहे) यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या शरवानिकानं आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्येही अनेक सुवर्णपदकं जिंकून भारताची मान उंचावली आहे.
आणखी हेही वाचा
माद्रिद ओपन २०२६: जोकोविच अल्काराझ यांची माघार- https://agcsport.tv/tennis/madrid-open-2026-star-players-withdraw-from-historic-tournament/
खलील अहमदच्या जागी मुंबईचा खेळाडू सीएसकेच्या ताफ्यात?-https://agcsport.tv/cricket/mumbai-player-to-replace-khaleel-ahmed-in-csk-squad/

