राहुल द्रविड

    0
    10
    Rahul Dravid is the player known as "The Wall" in the history of Indian cricket.
    rahul dravid

    भारतीय क्रिकेटच्या इतिहासात “द वॉल” म्हणून ओळखला जाणारा खेळाडू म्हणजे राहुल द्रविड. अत्यंत संयमी फलंदाजी, तांत्रिकदृष्ट्या मजबूत खेळ आणि संघासाठी दीर्घकाळ क्रीजवर टिकून राहण्याची क्षमता असलेला खेळाडू. यामुळे त्यांनी जागतिक क्रिकेटमध्ये मोठी ओळख निर्माण केली. कसोटी क्रिकेटमध्ये भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आपल्या शांत स्वभावामुळे आणि शिस्तबद्ध खेळामुळे ते क्रिकेटमधील सर्वात आदर्श खेळाडूंपैकी एक मानले जातात.

    सुरूवातीचं जीवन
    राहुल द्रविड यांचा जन्म ११ जानेवारी १९७३ रोजी इंदोर येथे झाला. त्यांचे बालपण प्रामुख्याने बंगळुरू येथे गेले. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची आवड होती. शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करत त्यांनी आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांची निवड कर्नाटक क्रिकेट संघामध्ये झाली.

    आंतरराष्ट्रीय पदार्पण
    राहुल द्रविड यांनी १९९६ साली भारतीय क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी पहिला कसोटी सामना इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध लॉर्ड्स क्रिकेट मैदान येथे खेळला. त्या सामन्यात त्यांनी ९५ धावांची उत्कृष्ट खेळी केली आणि सुरुवातीलाच आपल्या प्रतिभेची झलक दाखवली. आणि तिथेच ते प्रकाशझोतात आले. पुढेही त्यांनी शेवटच्या सामन्यापर्यंत भारतीय संघासाठी एका भिंतीसारखं काम केलं. 

    कारकिर्द आणि विक्रम
    राहुल द्रविड हे जगातील महान कसोटी फलंदाजांपैकी एक मानले जातात. त्यांनी भारतासाठी अनेक संस्मरणीय खेळी केल्या.

    • २००१ मध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मध्ये व्ही.व्ही.एस. लक्ष्मण सोबत ३७६ धावांची ऐतिहासिक भागीदारी केली.
    • कसोटी क्रिकेटमध्ये १३,००० पेक्षा जास्त धावा.
    • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४,००० पेक्षा जास्त धावा.
    • कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश आहे.
    • त्यांच्या दीर्घ आणि स्थिर फलंदाजीमुळे त्यांना “The Wall” ही उपाधी मिळाली.

    नेतृत्व आणि शैली
    राहुल द्रविड हे अत्यंत संयमी आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम फलंदाज होते. कठीण परिस्थितीत संघाला सावरण्याची त्यांची क्षमता खूप मोठी होती. २००५ ते २००७ या काळात त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपदही सांभाळले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने २००६ मध्ये दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाविरूद्ध दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला. नंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही भारतीय क्रिकेटसाठी मोठे योगदान दिले. राहुल द्रविड प्रशिक्षक असताना भारतीय संघाने टी२० चा विश्वचषक जिंकला आहे.

    पुरस्कार आणि सन्मान
    राहुल द्रविड यांच्या महान कामगिरीसाठी त्यांना अनेक सन्मान मिळाले.

    •  १९९८ साली त्यांना अर्जुन अवार्ड मिळाला.
    • २००४ साली पद्मश्री पुरस्कार मिळाला.
    • २०१३ साली पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.
    • आयसीसी कडून आयसीसी प्लेअर ऑफ द येअर – २००४.
    • २०१८ मध्ये आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम मध्ये समावेश.

    राहुल द्रविड यांचा शेवटचा आणि पदार्पण सामना

    कसोटी सामना
    पदार्पण– भारत विरूद्ध इंग्लंड, लॉर्ड्स – जुन २०-२४, १९९६
    शेवटचा सामना– भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया, ॲडलेड – जानेवारी २४-२८, २०१२

    एकदिवसीय सामना
    पदार्पण– भारत विरूद्ध श्रीलंका, सिंगापूर – एप्रिल ०३, १९९६
    शेवटचा सामना– भारत विरूद्ध इंग्लंड, कार्डिफ – सप्टेंबर १६, २०११

    टी२०आय सामना
    एकच– भारत विरूद्ध इंग्लंड, मॅनचेस्टर – ऑगस्ट ३१, २०११

    आयपीएल सामना
    पदार्पण– रॉयल चॅलेजर्स बंगळुरू विरूद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स, बंगळुरू- एप्रिल १८, २००८
    शेवटचा सामना– राजस्थान रॉयल्स विरूद्ध मुंबई इंडियन्स, दिल्ली – ऑक्टोंबर ०६, २०१३ 

    निष्कर्ष
    राहुल द्रविड हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान आणि आदर्श खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांच्या संयम, शिस्त आणि उत्कृष्ट फलंदाजीमुळे त्यांनी भारतीय क्रिकेटला नवी उंची दिली. त्यामुळे क्रिकेट जगतात त्यांचे नाव नेहमी आदराने आणि अभिमानाने घेतले जाते.

    Player Biography
    Full Nameराहुल द्रविड
    SportCricket
    CountryIndia
    Gendermale
    Playing Roleउजव्या हाताचा फलंदाज
    Date of Birth11/01/2026
    Total Matches
    Highest Score
    Total Career Score
    Latest Match
    Awards
    Previous articleसंदेश झिंगन
    Next articleविराट कोहली
    Akash_Sonawane
    AGC Sports मध्ये काम करताना त्या कथा शब्दांत मांडण्याचा प्रयत्न. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी आणि जगभरातील क्रीडा घडामोडींचा अभ्यास. खेळाडूंच्या प्रवासापासून ते विक्रमांपर्यंत – प्रत्येक गोष्ट सांगण्याची आवड. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापिठाच्या रानडे विभागातून मास कम्युनिकेशन ॲंड जर्नलिझनमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना मल्टिमीडिया आशयात विशेषत: प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया तसेच स्क्रिप्ट रायटिंग आणि वेब पत्रकारिया यात प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला. AGC Sports मध्ये क्रिडा बीट पाहत असताना अनेक गोष्टी विशेषत: क्रिकेट, फुटबॉल, हॉकी यांसारख्या खेळांची माहिती. तसेच गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत माहिती, अचूक, विश्वसनीय आणि वाचकांना लगेच समजेल अशा सोप्या भाषेत देण्यावर माझा प्रयत्न आहे.