फिफा विश्वचषकाच्या विजेत्याला मिळणार तब्बल ‘इतके’ रूपये!

FIFA World Cup 2026: फुटबॉल विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) आज ११ जून २०२६ पासून सुरू होत आहे. फुटबॉलच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठी स्पर्धा ठरणार आहे, कारण यामध्ये प्रथमच ३२ ऐवजी विक्रमी ४८ देश जागतिक विजेतेपदासाठी आमनेसामने येणार आहेत. या ऐतिहासिक स्पर्धेचे आयोजन अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन यजमान देशांमधील १६ प्रमुख शहरांमध्ये संयुक्तपणे केले जात आहे. आजपासून सुरू होणारा हा थरार १९ जुलै २०२६ पर्यंत रंगणार असून यात एकूण १०४ सामने खेळवले जातील.

बक्षीस रक्कम
यंदा फिफानं विश्वचषकाच्या एकूण कामगिरीवर आधारित बक्षीस रकमेत (Performance Prize Pool) ऐतिहासिक वाढ केली आहे. संपूर्ण स्पर्धेचा एकूण प्राईज पूल ६५५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ६,२४० कोटी रुपये) इतका निश्चित करण्यात आला असून, तो २०२२ च्या कतार विश्वचषकातील ४४० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जवळपास ५० टक्के जास्त आहे.

विजेता संघ (Champions): यंदा विश्वचषक उंचावणाऱ्या चॅम्पियन संघाला तब्बल ५० दशलक्ष डॉलर्स (सुमारे ४७६ कोटी रुपये) मिळतील. २०२२ मध्ये विजेत्या अर्जेंटिनाला ४२ दशलक्ष डॉलर्स मिळाले होते, त्या तुलनेत यात ८ दशलक्ष डॉलर्सची मोठी वाढ झाली आहे.

उपविजेता संघ (Runner-up): अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या उपविजेत्या संघाला ३३ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३१४ कोटी रुपये) बक्षीस दिले जाईल.

तिसरे आणि चौथे स्थान: तिसऱ्या क्रमांकावरील संघाला २९ दशलक्ष डॉलर्स (२७६ कोटी रुपये) तर चौथ्या स्थानावरील संघाला २७ दशलक्ष डॉलर्स (२५७ कोटी रुपये) मिळतील.

उपांत्यपूर्व फेरी (Quarterfinalists): ५ व्या ते ८ व्या क्रमांकावर बाहेर पडणाऱ्या चारही संघांना प्रत्येकी १९ दशलक्ष डॉलर्स (१८० कोटी रुपये) दिले जातील.

राउंड ऑफ १६ (Round of 16): ९ व्या ते १६ व्या क्रमांकावरील संघांना प्रत्येकी १५ दशलक्ष डॉलर्स (१४२ कोटी रुपये) मिळतील.

राउंड ऑफ ३२ (Round of 32): १७ व्या ते ३२ व्या क्रमांकावर बाहेर पडणाऱ्या संघांना प्रत्येकी ११ दशलक्ष डॉलर्स (१०४ कोटी रुपये) मिळतील.

ग्रुप स्टेजमधून बाहेर (Early Exit): सर्वात तळाच्या ३३ व्या ते ४८ व्या क्रमांकावर राहून ग्रुप स्टेजमधूनच बाद होणाऱ्या संघांनाही रिकाम्या हातानं जावं लागणार नाही. त्यांना प्रत्येकी ९ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ८५ कोटी रुपये) हमी रक्कम म्हणून मिळतील.

यंदाच्या ऐतिहासिक ४८ संघांच्या विस्तारामुळे बाद फेरीची रचना बदलली असून, १२ ग्रुपमधील अव्वल संघांसह एकूण ३२ संघ बाद फेरीत (Knockout Stage) पात्र ठरतील. काबो वर्डी, क्युरासाओ, जॉर्डन आणि उझबेकिस्तान हे ४ देश फुटबॉलच्या इतिहासात पहिल्यांदाच फिफा विश्वचषक खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. मेक्सिको सिटीमधील ऐतिहासिक ‘एस्टाडिओ अझ्टेका’ मैदानावर आज सलामीचा सामना खेळवला जाईल, तर १९ जुलै रोजी न्यू यॉर्क न्यू जर्सीच्या ‘मेटलाईफ स्टेडियमवर’ अंतिम सामना रंगणार आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.