FIFA World Cup 2026: आगामी होणाऱ्या फिफा वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ खेळत नसला तरीही भारताचा एक खेळाडू यंदाच्या फिफा वर्ल्डकपमध्ये खेळणार आहे. त्यामुळे भारतातील फुटबॉल चाहत्यांसाठी आणि देशासाठी हा एक खास क्षण असणार आहे. केरळचा रहिवासी असलेला तरुण फुटबॉलपटू ताहसिन मोहम्मद जमशीद याची कतारच्या विश्वचषक संघात निवड झाली असून भारतीय चाहत्यांना यंदाच्या विश्वचषक पाहण्यास आणखी एक चांगलं कारण मिळणार आहे.
यंदा ११ जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या जगातील या सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय वंशाचा अवघा १९ वर्षीय युवा खेळाडू तहसीन मोहम्मद जमशेद (Tahsin Mohammed Jamshid) यानं इतिहास रचला आहे. कतार राष्ट्रीय फुटबॉल संघानं आगामी फिफा विश्वचषकासाठी जाहीर केलेल्या आपल्या अंतिम २६ सदस्यीय अधिकृत संघात तहसीनला स्थान दिलं आहे. या ऐतिहासिक निवडीमुळे तो फिफा विश्वचषक संघात स्थान मिळवणारा पहिलाच मल्याळी आणि दुसरा भारतीय वंशाचा खेळाडू ठरला आहे (यापूर्वी २००६ मध्ये विकास धोरासू फ्रान्सकडून खेळला होता).
असा झाला कतार संघात प्रवेश
तहसीनचा जन्म आणि संगोपन कतारमध्ये झालं असलं, तरी त्याचे आई-वडील मूळचे केरळमधील कन्नूर (थलासेरी) गावचे राहणारे आहेत. त्याचे वडील जमशेद हे स्वतः १९९२ मध्ये भारताच्या युवा फुटबॉल संघात निवडले गेले होते, पण एका दुखापतीमुळे त्यांचे देशासाठी खेळण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यानंतर १९९६ मध्ये ते कतारमध्ये स्थायिक झाले. वडिलांना खेळताना पाहून लहानाचा मोठा झालेल्या तहसीननं वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षापासून फुटबॉल खेळायला सुरुवात केली. २०१७ मध्ये त्याच्या प्रतिभेची दखल घेत कतारच्या नामांकित ‘अल-दुहैल एससी’ (Al-Duhail SC) क्लबनं त्याला आपल्या सब-ज्युनियर संघात स्थान दिलं. तिथं त्यानं फिलिप कौटिन्हो आणि मार्को वेराट्टी सारख्या जागतिक स्टार्ससोबत सराव केला. कतारच्या अंडर-१७ आणि अंडर-१९ राष्ट्रीय संघातील दमदार कामगिरीनंतर, कतारचे मुख्य प्रशिक्षक जुलेन लोपेटेगुई यांनी त्याच्या स्फोटक वेग आणि उत्कृष्ट ड्रिब्लिंग कौशल्यामुळे त्याला थेट विश्वचषकाच्या मुख्य संघात निवडलं.
फिफा विश्वचषकातील कतारचा संघ ‘गट ब’ (Group B) मध्ये समाविष्ट आहे. या गटामध्ये कतारसोबत कॅनडा, स्वित्झर्लंड आणि बोस्निया & हर्झेगोव्हिना या संघाचा समावेश आहे.
भारतीय संघ या विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नसला, तरी १९ वर्षीय तरुण विंगर तहसीन मोहम्मदच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारतातील कोट्यवधी फुटबॉल चाहत्यांना यंदाच्या फिफा विश्वचषकात कतार संघाला मनापासून पाठिंबा देण्याचं एक अभिमानास्पद कारण मिळालं आहे.

