केकेआर संघाला आकाश दीपच्या रूपात आणखी एक धक्का

IPL 2026: आयपीएल 2026 चा हंगाम सुरू होण्यापूर्वीच कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) संघाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संघाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप (Akash Deep) सुद्धा पाठीच्या दुखापतीमुळे (Lower-back stress injury) या संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे.

कोलकत्ता नाईट रायडर्स संघाला एकापाठोपाठ एक धक्के बसत असून, आता अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीप संपूर्ण आयपीएल 2026 स्पर्धेला मुकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला किमान 8 ते 12 आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, ज्यामुळे तो फक्त आयपीएलच नाही, तर जूनमध्ये होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यालाही मुकण्याची शक्यता आहे.

केकेआरच्या दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी
आकाश दीपच्या रूपानं केकेआरला बसलेला हा तिसरा मोठा धक्का आहे. यापूर्वीच संघातील दोन महत्त्वाचे गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर आहेत, केकेआरसाठी महत्त्वाची कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा गुडघ्याच्या शस्त्रक्रियेमुळे (Knee surgery) या संपूर्ण हंगामातून आधीच बाहेर पडला आहे. तर यावर्षीच्या आयपीएलसाठी मोठा खर्च करून संघात घेतलेला आणि ‘डेथ-ओव्हर स्पेशलिस्ट’ म्हणून ओळख असलेला मथिशा पाथिराना पायाच्या दुखापतीमुळे (Calf strain) हंगामाच्या सुरुवातीच्या अर्ध्या टप्प्याला मुकणार आहे. तो एप्रिलच्या मध्यापर्यंत संघात समील होण्याची शक्यता सांगितली जात आहे.

संघासमोरील आव्हाने आणि पुढील रणनीती
आकाश दीप आणि हर्षित राणा यांसारख्या भारतीय वेगवान गोलंदाजांच्या अनुपस्थितीमुळे केकेआरच्या गोलंदाजीचा समतोल पूर्णपणे बिघडला आहे. आता संघाकडे भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये उमरान मलिक, कार्तिक त्यागी आणि वैभव अरोरा यासारखे पर्याय केकेआरकडे उरले आहेत.

या दुखापतींमुळे संघ व्यवस्थापन आता तातडीने बदली खेळाडूंच्या (Replacements) शोधात आहे. सध्या सरावासाठी ताफ्यात असलेल्या नवदीप सैनी, आकाश मधवाल, सिमरजीत सिंग किंवा के. एम. आसिफ यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः आकाश मधवालच्या ‘डेथ ओव्हर’मधील अनुभवाचा विचार संघ करू शकतो.

केकेआरचा या हंगामातील पहिला सामना 29 मार्च 2026 रोजी मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. अत्यंत कमी वेळ शिल्लक असल्याने, या पहिल्या सामन्यापूर्वी संघ आपली गोलंदाजीची फळी कशी सावरतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.