Orléans Masters 2026: फ्रान्समध्ये सध्या Orléans Masters स्पर्धा सुरू आहे.या स्पर्धेत भारताची उदयोन्मुख बॅडमिंटन स्टार तन्वी शर्मा हिने ऑर्लिन्स मास्टर्स सुपर ३०० स्पर्धेत आपली विजयी घोडदौड कायम ठेवत उपांत्य फेरी गाठली आहे. शुक्रवारी (२० मार्च) रात्री झालेल्या अटीतटीच्या उपांत्यपूर्व फेरीत तन्वीने आपल्यापेक्षा अनुभवी आणि जागतिक क्रमवारीत सरस असलेल्या जपानच्या खेळाडूला पराभूत करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तन्वीने कसा मिळवला विजय
उपांत्यपूर्व फेरीत तन्वी शर्माने जपानच्या सहाव्या मानांकित खेळाडू Natsuki Nidaira हिला सरळ गेममध्ये पराभूत केले. हा सामना पूर्णपणे तन्वीच्या नियंत्रणात राहिला. तिने 21-14, 21-14 अशा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. हा सामना जवळपास 43 मिनिटांत संपला आणि तन्वीने आक्रमक खेळ दाखवत तिच्यावर विजय मिळवला.
सामन्याच्या सुरुवातीला तन्वी पिछाडीवर होती. पण नंतर तिचे स्मॅश, ड्रॉप शॉट्स आणि कोर्टवरील हालचाल अत्यंत प्रभावी ठरली आणि तिने प्रतिस्पर्धीवर दबाव निर्माण केला. निडायरा ही अनुभवी आणि जागतिक क्रमवारीत वरची खेळाडू असतानाही तन्वीने कोणतीही भीती न बाळगता खेळ करत तिला पूर्णपणे पिछाडीवर टाकले.
तिची अलिकडील कामगिरी कशी आहे?
तन्वी शर्माची अलीकडील कामगिरी पाहता, ती सातत्याने उत्कृष्ट खेळ करत आहे. 2025 मध्ये तिने BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले होते, तसेच ती BWF वर्ल्ड टूर फायनल गाठणारी सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरली आहे. त्यामुळे तिच्या या यशाकडे भारतीय बॅडमिंटनच्या नव्या पिढीच्या उदय म्हणून पाहिले जात आहे.
सेमीफायनलचा सामना कोणाविरूद्ध होणार आहे?
आता उपांत्य फेरीत तन्वीचा सामना जपानच्या अनुभवी आणि माजी विश्वविजेत्या Nozomi Okuhara हिच्याविरुद्ध होणार आहे. हा सामना अत्यंत कठीण मानला जात असून तो 21 मार्च 2026 रोजी खेळवला जाणार आहे. ओकुहारा ही ऑलिम्पिक पदकविजेती आणि अनुभवी खेळाडू असल्याने तन्वीसमोर मोठे आव्हान असेल.
दरम्यान, या स्पर्धेत भारताची आणखी एक खेळाडू इशाराणी बरुआ हिनेही सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता उपांत्य फेरीत इशाराणीचा सामना थायलंडच्या पिचमन ओपाटनिपुथ विरुद्ध होणार आहे.
पुरुष दुहेरीत मात्र, भारताच्या एम. आर. अर्जुन आणि हरिहरन आमसाकरुणन या जोडीला इंडोनेशियाच्या लिओ कार्नांडो आणि बगास मौलाना या जोडीकडून १२-२१, २०-२२ असा पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.

