सचिन तेंडुलकरांना आऊट करणारा गोलंदाज आज बारमध्ये गातोय गाणे!

हेन्री ओलोंगा हा गोलंदाज एकेकाळी त्याच्या वेगवान गोलंदाजीने अनेक मोठ्या फलंदाजांना अडचणीत टाकायचा. अगदी सचिन तेंडुलकर सारख्या महान फलंदाजालाही त्याच्या बाऊन्सरचा सामना करताना सावधपणे खेळावे लागायचे. मात्र आज त्याच खेळाडूचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. क्रिकेटपासून दूर झाल्यानंतर तो सध्या ऑस्ट्रेलियामध्ये गायक म्हणून काम करत असून लहान बार, क्रूझ शिप आणि शाळांमध्ये गाणी गाऊन आपला उदरनिर्वाह करत आहे.

वेगवान गोलंदाज म्हणून ओळख

हेन्री ओलोंगा हा झिम्बाब्वेच्या क्रिकेट इतिहासातील पहिल्या कृष्णवर्णीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. त्याने तरुण वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अवघ्या १८व्या वर्षी त्याने झिम्बाव्बे क्रिकेट संघाकडून खेळायला सुरुवात केली. त्याच्या वेगवान गोलंदाजी आणि तीव्र बाऊन्सरमुळे अनेक आंतरराष्ट्रीय फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागत असे. त्याच्या गोलंदाजीची चर्चा त्या काळात विशेषतः भारतीय चाहत्यांमध्येही होत असे.

संगीताचीही होती आवड

क्रिकेटसोबतच ओलोंगा लहानपणापासून संगीताचीही आवड होती. तो क्रिकेट खेळत असतानाही गाणी लिहायचा आणि गायचा. २००१ साली त्याने ‘Our Zimbabwe’ हे गाणे प्रकाशित केले होते. त्या काळात झिम्बाब्वेमध्ये राजकीय तणाव आणि हिंसाचार वाढत होता आणि या गाण्यात देशाविषयीची वेदना आणि आशा दोन्ही व्यक्त करण्यात आल्या होत्या.

२००३ विश्वचषकातील ऐतिहासिक निषेध

ओलोंगाच्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना २००३ च्या विश्वचषका दरम्यान घडली. त्या स्पर्धेत त्याने आणि त्याचा सहकारी अँडी फ्लॉवर यांनी मैदानात उतरतानाच हाताला काळी पट्टी बांधून निषेध नोंदवला. हा निषेध त्या वेळी झिम्बाब्वेमध्ये असलेल्या राजकीय परिस्थिती आणि लोकशाहीवरील संकटाविरोधात होता.

त्या काळात देशात रॉबर्ट मुगाबे यांचे सरकार सत्तेत होते आणि सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर दबाव असल्याचे आरोप होत होते. ओलोंगा आणि फ्लॉवर यांच्या या कृतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा निर्माण झाली.

मोठी किंमत

या निषेधानंतर ओलोंगाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले. त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या, संघातून बाहेर काढण्यात आले आणि अखेर त्याला झिम्बाब्वे सोडावे लागले. पुढे तो ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला.

एका मुलाखतीत ओलंगा सांगतो की, ‘त्याच्यावर देशद्रोहाचे आरोप करण्यात आले. अनेकांना वाटले की, त्याने सरकारची बदनामी केली. या संपूर्ण परिस्थितीमुळे झिम्बाब्वेमधील क्रिकेट आणि राजकीय वातावरण त्याच्यासाठी असह्य झाले होते’.

क्रिकेटनंतरचा संघर्ष

क्रिकेटमधून बाहेर पडल्यानंतर ओलंगाला जीवनासाठी संघर्ष करावा लागला. ऑस्ट्रेलियात स्थायिक झाल्यानंतर त्याने विविध नोकऱ्या केल्या. गेल्या काही वर्षांपासून तो गायक म्हणून काम करत आहे.

तो क्रूझ शिप, लहान शहरांतील कार्यक्रम, शाळा आणि बारमध्ये गाणी गातो. प्रेक्षकांची संख्या अनेकदा खूपच कमी असते. स्वतः ओलंगाही मान्य करतो की हे एखाद्या गायकाच्या कारकिर्दीचे सर्वोच्च स्थान नाही, पण सध्या हीच त्याची वास्तव परिस्थिती आहे.

भारतीय चाहत्यांच्या आठवणीत अजूनही

भारतीय क्रिकेट चाहत्यांना ओलोंगा विशेषतः एका घटनेमुळे आठवतो. १९९८ मधील आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दरम्यान त्याने आपल्या बाऊन्सरवर सचिन तेंडुलकरला बाद केले होते. हा विकेट त्या काळात खूप चर्चेत राहिला होता.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.