आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ उपांत्य फेरीसाठी लढत सुरू आहे. त्यातलेच आता काहीच सामने राहिले आहेत. ग्रुप स्टेज २ मधील कालच्या सामन्याने पाकिस्तानच्या यंदाच्या विश्वचषकाच्या आशा जिंवत ठेवल्या आहेत. काल इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सामना झाला. इंग्लंडने हा सामना ४ विकेट्स राखून न्यूझीलंडचा पराभव केला. पण जर कालच्या सामन्यात न्यूझीलंडचा संघ जिंकला असता तर पाकिस्तानच्या यावर्षी उपांत्य फेरीच्या आशा संपुष्टात आल्या असत्या. त्यामुळे काल इंग्लंडच्या जिंकण्याने पाकिस्तानचा चांगलाचं फायदा झाला आहे.
आता पाकिस्तानचा संघ कसा खेळणार सेमीफायनल?
सध्या पाकिस्तानचा संघ ग्रुप स्टेज २ मध्ये खेळत आहे. त्यात पाकिस्तान गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडने आधीच उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. न्यूझीलंडचा संघ ३ गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. आणि त्यांचे सगळे सामनेही संपले आहेत. त्यामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरी खेळण्यासाठी पुढचा श्रीलंकेविरूद्धचा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. पण पाकिस्तानच्या संघाला फक्त जिंकूनही चालणार नाही. कारण फक्त जिंकले तरी त्यांचे गुण ३ होणार आहे. म्हणजेच न्यूझीलंड संघाचे जितके आहे तेवढेच.
मग आता पाकिस्तानचं उपांत्य फेरीत जाण्याचं समीकरण कसं आहे?
न्यूझीलंड संघाचे ३ गुण आहेत आणि रन रेटही चांगलं आहे. न्यूझीलंडचं रन रेट +१.३९० आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा रन रेट -०.४६१ आहे. त्यामुळे पाकिस्तानला श्रीलंकेविरूद्धचा सामना फक्त जिंकायचं नाही तर न्यूझीलंड संघाच्या रन रेटच्याही पुढं जायचं आहे. तेव्हाच पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत जाऊ शकतो. त्यासाठी पाकिस्तानला दुसऱ्या क्रमांकावर जागा मिळवण्यासाठी प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेविरुद्ध ६४ धावांनी विजय मिळवावा लागेल किंवा दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना १३.१ षटकांत लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल, जेणेकरून पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित करू शकेल.
पण पाकिस्तान श्रीलंकेला मोठ्या फरकाने हरवू शकेल का?
जेव्हापासून ग्रुप स्टेजचे सामने चालू आहेत. तेव्हापासून श्रीलंकेच्या संघाचा खराब फॉर्म चालू आहे. त्यांनी त्यांचे मागिल दोन्ही सामने हरले आहेत आणि आधीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर सुद्धा पडले आहेत.
पाकिस्तान संघाचा आणि श्रीलंकेचा फॉर्म पाहता पाकिस्तान श्रीलंकेला हरवू शकते असं चित्र दिसून येत आहे. कारण श्रीलंकेकडे या सामन्यासाठी त्यांचा वेगवान गोलंदाज मथेशा पाथिराना दुखापतींमुळे बाहेर बसू शकतो. तर बाकीचे गोलंदाजांना यंदा चांगलाच चोप बसला आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेचे फलंदाज सुद्धा फॉर्ममध्ये नाहीत. त्यामुळे पाकिस्तान संघाला चांगलाच फायदा झाला आहे. असं असलं तरीही श्रीलंका पाकिस्तानला हरवण्यासाठी अनेक प्रयत्न करतील. कारण उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यामुळे श्रीलंकेचा कर्णधार आणि खेळाडूंवर चांगलाचं दबाव निर्माण झाला आहे.

