Singapore Open 2026: सिंगापूर इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या प्रतिष्ठित कॅपीटल एफएफ (KFF) सिंगापूर ओपन 2026 (BWF सुपर 750) बॅडमिंटन स्पर्धेत आज (शुक्रवार 29 मे) भारतासाठी संमिश्र दिवस राहिला. पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीत भारतानं शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत (Semifinals) धडक मारली आहे, मात्र एकेरीच्या लढतींमध्ये भारताचं आव्हान पूर्णपणे संपुष्टात आलं आहे.
सात्विक-चिरागचे पुनरागमन
पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व (Quarterfinals) सामन्यात भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या अव्वल मानांकित जोडीनं मलेशियाच्या अॅरॉन ताई आणि कांग खाई झिंग जोडीविरुद्ध 19-21, 21-17, 21-13 असा तीन गेमच्या थरारात विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर आणि दुसऱ्या गेममध्ये 3-8 ने पिछाडीवर असताना भारतीय जोडीनं उत्कृष्ट कौशल्य दाखवत अप्रतिम पुनरागमन केलं. मिश्र दुहेरीमध्ये भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो जोडीनं अनपेक्षितपणे उपांत्य फेरी गाठली, कारण पहिल्या गेममध्ये मलेशियाचे जागतिक विजेते चेन टांग जी आणि तोह ई वेई 18-16 ने आघाडीवर असताना दुखापतीमुळे सामन्यातून रिटायर्ड हर्ट झाले.
सिंधू आणि लक्ष्य सेनचे आव्हान संपुष्टात
दुसरीकडे, भारताला एकेरीमध्ये मोठे झटके बसले. महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत दोन वेळच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूला जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या ॲन से यंगकडून 17-21, 14-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. सिंधूनं सुरुवातीला चांगली झुंज दिली, पण ॲन से यंगच्या उत्कृष्ट डिफेन्ससमोर तिची चूक नडल्यानं तिला पराभूत व्हावं लागल. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनला जपानच्या कोकी वातानाबेविरुद्ध 19-21, 21-15, 15-21 असा तब्बल तीन गेम चाललेल्या चुरशीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामुळे भारताचं एकेरीतील आव्हान संपलं आहे.
उपांत्य फेरी कधी?
आजच्या लढतींनंतर विजय मिळवणारे सात्विक-चिराग आणि ध्रुव-तनिषा हे खेळाडू उद्या शनिवार, 30 मे 2026 रोजी आपापले उपांत्य फेरीचे (Semifinals) सामने खेळतील. पुरुष दुहेरीत सात्विक-चिरागचा मुकाबला दक्षिण कोरियाच्या प्रबळ दावेदार जोडीविरुद्ध होणार आहे.

