RCB vs GT Qualifier 1 : काल 26 मे 2026 रोजी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियम, धर्मशाळा येथे आयपीएल 2026 चा पहिला क्वालिफायर (Qualifier 1) सामना खेळवला गेला. हा सामना डिफेंडिंग चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात झाला आणि 92 धावांनी आरसीबीनं धुव्वा उडवला. या विजयामुळे आरसीबीनं सलग दुसऱ्यांदा थेट अंतिम फेरीत (Final) प्रवेश केला आहे.
गुजरात टायटन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाला पहिली फलंदाजी करावी लागली. आरसीबीच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. सलामीवीर विराट कोहलीनं अवघ्या 25 चेंडूंत 43 धावांची वेगवान खेळी रचली. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या रजत पाटीदारनं मैदानावर जीटीच्या गोलंदाजांचा चांगलचं धुवून काढलं. पाटीदारनं अवघ्या 33 चेंडूंत 5 चौकार आणि 9 षटकारांची आतषबाजी करत नाबाद 93 धावांची विस्मयकारक खेळी साकारली. त्याला कृणाल पंड्यानं 28 चेंडूंत 43 धावांची साथ दिली. या सगळ्यांच्या आक्रमक खेळीनं आरसीबीनं 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 254 धावांचा डोंगर उभा केला.
प्रत्युत्तरात 255 धावांचा पाठलाग करतानी उतररलेल्या गुजरात टायटन्सचा डाव पूर्णपणे विस्कळीत झाला. आरसीबीच्या वेगवान गोलंदाजांनी पॉवरप्लेच्या 6 षटकांतच गुजरातचं 5 मुख्य फलंदाज तंबूत पाठवून त्यांचं कंबरडं मोडलं. कर्णधार शुभमन गिल अवघ्या 2 धावांवर बाद झाला. फक्त राहुल तेवतियानं एकाकी झुंज देत 43 चेंडूंत 8 चौकार आणि 4 षटकारांसह 68 धावा केल्या. मात्र, इतर फलंदाजांच्या अपयशामुळे गुजरातचा संपूर्ण संघ 19.3 षटकांत अवघ्या 162 धावांवर ऑलआऊट झाला.
गुजरातच्या पराभवाचे कारण
गुजरातचा संघ हा सामना त्यांच्या अत्यंत खराब गोलंदाजी आणि पॉवरप्लेमधील फलंदाजीच्या अपयशामुळे हरला. कागिसो रबाडा (54 धावा) आणि प्रसिद्ध कृष्णा (53 धावा) या त्यांच्या प्रमुख गोलंदाजांना पाटीदारनं सहज लक्ष्य केलं. पाठलाग करताना सुरुवातीलाच 5 गडी स्वस्तात गमावल्यामुळे गुजरात सामन्यात पुनरागमन करू शकला नाही. तसेच मुख्य पराभवाचं कारण म्हणजे आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याचे दोन झेल सोडले. त्याचे हे दोन झेल तेव्हा सोडले, ज्यावेळी तो अवध्या 14 आणि 20 धावांवर होता. याचं दोन झेलचा परिणाम असा झाला की, पाटीदारनं अवध्या 33 चेंडूत 93 धावा केल्या आणि आरसीबीला एका उत्तम स्थितीत नेऊन ठेवलं.
आरसीबीनं उभारलेला 254/5 हा आयपीएलच्या संपूर्ण इतिहासातील प्लेऑफ फेरीमधील सर्वोच्च स्कोअर ठरला आहे. तसेच रजत पाटीदारनं 90 पेक्षा जास्त धावांची आयपीएल इतिहासातील सर्वात जलद खेळी (Quickest Innings) खेळण्याचा विक्रम केला.
गुजरात टायटन्सचा पराभव झाला असला, तरी ते अव्वल दोनमध्ये राहिल्यामुळे त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी क्वालिफायर 2 मध्ये अजून एक संधी मिळणार आहे. त्यामुळे जीटीचं आणि त्यांचं चाहत्यांचं लक्ष्य या सामन्याकडे लागलं आहे.

