R. Praggnanandhaa: रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथील ‘म्युझियम ऑफ द नॅशनल बँक ऑफ रोमानिया’ येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठित ग्रँड चेस टूरच्या सुपर चेस क्लासिक 2026 बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद (R. Praggnanandhaa) याला या हंगामातील पहिल्या पराभवाचा धक्का बसला आहे. 21 मे 2026 रोजी पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या सातव्या फेरीत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनानं (Fabiano Caruana) प्रज्ञानंदला पराभूत केलं आहे. या पराभवामुळे प्रज्ञानंदचं स्पर्धेतील अव्वल स्थान निसटलं असून तो आता 3.5 गुणांसह चौथ्या स्थानावर खाली घसरला आहे.
ही चुक पडली प्रज्ञानंदला महागात
या रोमांचक सामन्यात प्रज्ञानंद पांढऱ्या सोंगट्यांनी (White Pieces) खेळत होता. त्यानं ‘क्वीन्स गॅम्बिट डिक्लाईंड’ (Queen’s Gambit Declined) या आक्रमक रणनीतीनं खेळाची सुरुवात केली. सामन्याच्या 19 व्या चालीवर प्रज्ञानंदनं एक अतिरिक्त प्यादे मारून सामन्यावर चांगली पकड मिळवली होती. मात्र, मध्य टप्प्यात 24 व्या चालीवर त्यानं आपली वजीर (Queen) चुकीच्या जागेवर सरकवण्याची एक मोठी चूक केली, ज्याचा फायदा कारुआनानं उचलला. कारुआनानं आपल्या प्याद्यांना आक्रमकपणे पुढे सरकवत प्रज्ञानंदच्या राजाला सर्व बाजूंनी घेरलं. अखेर 33 व्या चालीवर कारुआनाचा प्यादा वजीर बनण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्यामुळे प्रज्ञानंदला हार मानावी लागली.
प्रज्ञानंदनं या 9 फेऱ्यांच्या स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 7 फेऱ्यांपैकी 1 फेरीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे, तर 5 फेऱ्या ड्रॉ केल्या आहेत आणि 1 सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला आहे. सातव्या फेरीअखेर कारुआना, व्हिन्सेंट कीमर आणि जॉर्डन व्हॅन फोरेस्ट हे प्रत्येकी 4.5 गुणांसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत.
प्रज्ञानंदचा पुढील आठव्या फेरीचा सामना आज (22 मे) फ्रान्सच्या मॅक्सिम वॅशियर-लाग्राव्हविरुद्ध होणार आहे. जेतेपदाच्या शर्यतीत पुनरागमन करण्यासाठी प्रज्ञानंदला या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य आहे.
आणखी हेही वाचा
सुपर चेस क्लासिक 2026 बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याला या हंगामातील पहिल्या पराभवाचा धक्का बसला आहे-https://agcsport.tv/cricket/csk-playoff-dream-shattered-sudarshan-breaks-sachin-tendulkars-record/?_thumbnail_id=1944

