चिदंबरमने रचला इतिहास; ‘या’ स्पर्धेसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू

Esports World Cup: भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमने (Aravindh Chithambaram) बुद्धिबळात जागतिक स्तरावर एक अभूतपूर्व इतिहास रचला आहे. अमेरिकेतील ड्रीमहॅक अटलांटा येथे आयोजित ‘रोड टू ईडन’ पात्रता फेरीत (Road to EWC qualifier) विजय मिळवून तो ‘ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप 2026’ (Esports World Cup 2026) च्या मुख्य बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

कोण आहे अरविंद चिदंबरम?
तामिळनाडूच्या मदुराई येथील रहिवासी असलेला 26 वर्षीय अरविंद हा भारताचा अव्वल दर्जाचा बुद्धिबळपटू आहे. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्यानं आंतरराष्ट्रीय मास्टर आणि 2015 मध्ये ‘ग्रँडमास्टर’ (GM) ही सर्वोच्च पदवी मिळवली. तो 2018 आणि 2019 मध्ये सलग दोनवेळा राष्ट्रीय प्रीमियर बुद्धिबळ चॅम्पियन राहिला आहे. विशेष म्हणजे, क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्झ या तिन्ही फॉरमॅटमध्ये राष्ट्रीय विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय आहे. सध्या तो जागतिक क्रमवारीत 11 व्या क्रमांकावर असून भारतातील 4 था अव्वल खेळाडू आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अरविंदनं अत्यंत कठीण आणि दबावाच्या ‘रॅपिड फॉरमॅट’ (10 मिनिटांचे सामने) खेळताना जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. मुंबईस्थित आघाडीच्या ‘S8UL ईस्पोर्ट्स’ संस्थेचे प्रतिनिधित्व करताना त्यानं काइलर रेनेस आणि क्रिस्टोफर वू यांना पराभूत केलं. त्यानंतर, ‘अर्मागेडन’ (Armageddon) टायब्रेकरच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्यानं रशियाच्या बलाढ्य ग्रँडमास्टर अलेक्सी सराना याचा पराभव करून थेट मुख्य स्पर्धेत स्थान निश्चित केलं. या सुवर्ण कामगिरीसाठी त्याला 15,000 अमेरिकन डॉलर्स (सुमारे 14 लाख रुपये) चं बक्षीस मिळालं आहे.

स्पर्धेचे महत्त्व
हा जागतिक ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप 11 ते 15 ऑगस्ट 2026 दरम्यान सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे खेळवला जाणार असून, यासाठी 1.5 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 14 कोटी रुपये) चं भव्य बक्षीस बजेट ठेवण्यात आलं आहे. अरविंद व्यतिरिक्त भारताचे निहाल सरिन आणि एम. प्रानेश हे देखील पुढील पात्रता फेऱ्यांद्वारे या स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी शर्यतीत कायम आहेत.

आणखी हेही वाचा
जॅनिक सिनरने नोव्हाक जोकोविचचा महाविक्रम मोडीत काढत पटकावले विजेतेपद-
https://agcsport.tv/tennis/janik-sinner-breaks-novak-djokovic-record-to-win-title/

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.