RCB vs PBKS: काल 17 मे 2026 रोजी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन (HPCA) स्टेडियम, धर्मशाळा येथे खेळवल्या गेलेल्या आयपीएल 2026 च्या 61 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघानं पंजाब किंग्सचा (PBKS) 23 धावांनी पराभव केला. या विजयामुळे आरसीबी चालू हंगामात अधिकृतपणे प्लेऑफ (Playoffs) फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ बनला आहे. तर दुसरीकडे पंजाब किंग्सचे बाद फेरीचे स्वप्न जवळपास संपुष्टात आले आहे.
या सामन्यात पंजाब किंग्सनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघाला पहिली फलंदाजी करावी लागली. आरसीबीची सुरुवात जोरदार झाली. सलामीवीर विराट कोहलीनं 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. मात्र, मधल्या फळीत आलेल्या वेंकटेश अय्यरनं मैदानात पंजाबच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. त्यानं आक्रमक खेळत अवघ्या 40 चेंडूंत नाबाद 73 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनं 25 चेंडूत 45 धावा काढल्या आणि या सगळ्यांच्या जोरावर आरसीबीनं निर्धारित 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 222 धावांचा स्कोअर उभा केला.
223 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना पंजाब किंग्सची सुरुवात अतिशय खराब झाली. भुवनेश्वर कुमार आणि रसिक सलाम दार यांनी सुरुवातीच्या षटकांतच पंजाबला धक्के देत त्यांची स्थिती 19 धावांवर 3 बळी अशी बिकट केली. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज शशांक सिंगनं 27 चेंडूंत 56 धावांची स्फोटक खेळी करत पंजाबला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाढत्या धावगतीमुळे पंजाबचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यांचा संघ 20 षटकांत 8 गड्यांच्या मोबदल्यात 199 धावाच करू शकला.
पंजाब किंग्सनं कुठे गमवला सामना
पंजाबचा संघ हा सामना त्यांच्या खराब पॉवरप्ले फलंदाजी आणि दिशाहीन गोलंदाजीमुळे हरला. 223 धावांचा पाठलाग करताना पॉवरप्लेच्या पहिल्या 4 षटकांतच त्यांचे 3 मुख्य फलंदाज तंबूत परतल्यामुळे संघावर प्रचंड दबाव निर्माण झाला. तसेच, आरसीबीच्या डावादरम्यान डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजांनी दिलेल्या अतिरिक्त धावांमुळे सामना पंजाबच्या हातातून पूर्णपणे निसटला. या पराभवामुळे पंजाब किंग्स आता जवळपास आयपीएल 2026 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
आणखी हेही वाचा
15 वर्षापासून आरसीबीविरूद्ध पंजाबला मिळाला नाही विजय-https://agcsport.tv/cricket/punjab-have-not-won-against-rcb-for-15-years/

