Thailnad Open 2026: थायलंडमधील बँकॉक येथील निमिबुत्र स्टेडियमवर प्रतिष्ठित टायोटा थायलंड ओपन 2026 (BWF सुपर 500) बॅडमिंटन स्पर्धा नुकतीच पार पडली. यात स्पर्धेत भारताला मोठा धक्का बसला आहे. आज (17 मे) झालेल्या पुरुष दुहेरीच्या अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात (Final) भारताच्या अव्वल मानांकित सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. इंडोनेशियाच्या बिनमानांकित जोडीनं भारतीय जोडीचा पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं, ज्यामुळे सात्विक-चिरागला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.
असा झाला अंतिम सामन्यात पराभव
53 मिनिटे चाललेल्या या अटीतटीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या लिओ रॉली कार्नांडो आणि डॅनियल मार्थिन जोडीनं सात्विक-चिरागचा 12-21, 23-25 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पहिल्या गेममध्ये इंडोनेशियन जोडीनं सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत 11-4 अशी भक्कम आघाडी घेतली आणि सामना 12-21 असा एकतर्फी जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सात्विक-चिरागनं अप्रतिम पुनरागमन केलं होतं. त्यांनी उत्कृष्ट मानसिक संयम दाखवत सलग चार मॅच पॉईंट्स वाचवले. मात्र, निर्णायक क्षणी इंडोनेशियाच्या डॅनियल मार्थिननं मारलेल्या वेगवान स्मॅशमुळे भारतानं हा गेम गमावला.
या चुका भारताला महागात पडल्या
या सामन्यात भारतीय जोडी कमालीची ऑफ-फॉर्म दिसली. सात्विक आणि चिरागनं नेटजवळ अनेक ‘अनफोर्स्ड एरर्स’ (चुका) केल्या, ज्यामुळे इंडोनेशियाला सहज गुण मिळाले. याशिवाय, पहिल्या गेममधील अत्यंत संथ सुरुवात आणि डॅनियल मार्थिनच्या पाठीमागून येणाऱ्या वेगवान स्मॅशेसला वेळेवर न रोखता येणं भारताला सर्वात महागात पडलं.
प्रतिस्पर्ध्यासोबतचे रेकॉर्ड
विशेष म्हणजे, या सामन्यापूर्वी सात्विक-चिरागचा कार्नांडो-मार्थिन जोडीविरुद्धचा ‘हेड-टू-हेड’ रेकॉर्ड 4-0 असा एकतर्फी होता. इंडोनेशियाच्या या जोडीनं कारकिर्दीत पहिल्यांदाच भारतीय जोडीला पराभूत केलं आहे.
या स्पर्धेत सात्विक-चिरागनं पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या पुत्रा-बगास जोडीचा, दुसऱ्या फेरीत मलेशियाच्या ब्रायन-हायकल जोडीचा, आणि उपांत्य फेरीत मलेशियाच्या गोह-इझुद्दीन जोडीचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. या पराभवामुळे सात्विक-चिरागची मागील दोन वर्षांपासूनची विजेतेपदाची प्रतीक्षा अजून वाढली आहे, कारण त्यांनी त्यांचं शेवटचं विजेतेपद 2024 च्या थायलंड ओपनमध्येच जिंकलं होतं.
आणखी हेही वाचा
15 वर्षापासून आरसीबीविरूद्ध पंजाबला मिळाला नाही विजय-https://agcsport.tv/cricket/punjab-have-not-won-against-rcb-for-15-years/

