Satvik Chirag Final: थायलंडमधील बँकॉक येथील निमिबुत्र स्टेडियमवर सुरू असलेल्या प्रतिष्ठित टायोटा थायलंड ओपन 2026 (BWF सुपर 500) बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल मानांकित जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं अप्रतिम कामगिरी केली आहे. आज (16 मे 2026) झालेल्या पुरुष दुहेरीच्या अत्यंत चुरशीच्या उपांत्य फेरीच्या (Semifinals) सामन्यात विजय मिळवून त्यांनी दिमाखात अंतिम फेरीत (Final) प्रवेश केला आहे. या विजयासह सात्विक-चिरागनं या हंगामातील त्यांच्या पहिल्या विजेतेपदाच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे.
आज खेळवल्या गेलेल्या लढतीत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या सात्विक आणि चिरागनं मलेशियाच्या तिसऱ्या मानांकित गोह शे फेई आणि नूर इझुद्दीन जोडीचा तब्बल 82 मिनिटे चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात 19-21, 22-20, 21-16 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये मलेशियन जोडीनं अप्रतिम खेळ करत 21-19 असा विजय मिळवून भारतीयांवर दडपण आणलं होतं. दुसऱ्या गेममध्येही एका वेळी सात्विक-चिराग पराभवाच्या छायेत होते, पण त्यांनी जबरदस्त मानसिक संयम दाखवत गेम 22-20 असा खिशात घातला. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये सात्विकच्या वेगवान स्मॅशेस आणि चिरागच्या उत्कृष्ट नेट प्लेसमोर मलेशियन जोडीला काहीही करता आलं नाही आणि भारताच्या या जोडीनं 21-16 नं जिंकून सामना आपल्या नावावर केला. या विजयामुळे त्यांनी मलेशियन जोडीविरुद्धचा आपला ‘हेड-टू-हेड’ रेकॉर्ड 8-2 असा भक्कम केला आहे.
स्पर्धेच्या सुरूवातीपासूनच या भारतीय जोडीनं उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या जोडीचा (पुत्रा एरवियंशाह आणि बगास मौलाना) 19-21, 23-21, 21-10 असा तीन गेमच्या थरारात पराभव केला. दुसरी फेरीत (Round of 16) मलेशियाच्या ब्रायन जेरेमी गुंटिंग आणि मुहम्मद हायकल जोडीचा 21-12, 21-19 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवला. तर उपांत्यपूर्व फेरीत (Quarterfinal) जपानच्या सहाव्या मानांकित ताकुमी नोमुरा आणि युइची शिमोगामी जोडीला 41 मिनिटांत 21-12, 21-13 असं सहज नमवून त्यांनी सेमीफायनल गाठली होती.
फायनल कधी?
सात्विक-चिरागचा जेतेपदासाठीचा अंतिम सामना उद्या (रविवार, 17 मे 2026) खेळवला जाईल. या सामन्यात त्यांची लढत इंडोनेशियाच्या लिओ रॉली कार्नांडो आणि डॅनियल मार्थिन किंवा चीनच्या हे जी टिंग व रेन शियांग यू यांच्यातील विजेत्या जोडीशी होईल. यापूर्वी 2019 आणि 2024 मध्ये थायलंड ओपनचं विजेतेपद पटकावलेल्या भारतीय जोडीला आता तिसऱ्यांदा या स्पर्धेवर आपलं नाव कोरण्याची सुवर्णसंधी आहे.

