Thailand Open 2026: थायलंडमधील बँकॉक येथील निमिबुत्र स्टेडियमवर ‘थायलंड ओपन 2026’ (BWF सुपर 500) बॅडमिंटन सुरू आहे. या स्पर्धेत अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन आणि पुरुष दुहेरीतील अव्वल मानांकित सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीनं आपापल्या लढती जिंकून दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत (Quarterfinals) प्रवेश केला आहे. मात्र, माजी जागतिक अव्वल मानांकित किदाम्बी श्रीकांत आणि अनेक युवा खेळाडूंचे आव्हान दुसऱ्या फेरीत संपुष्टात आले.
महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत दोन वेळच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूनं डेन्मार्कच्या आमली शुल्झचा अवघ्या २८ मिनिटांत 21-13, 21-15 असा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूनं पहिल्या फेरीमध्ये चायनीज तैपेईच्या तुंग सियु-तोंगवर 21-9, 21-12 अशी मात केली होती. पुरुष एकेरीत सातव्या मानांकित लक्ष्य सेननं चीनच्या झू झुआन चेनविरुद्ध 39 मिनिटांत 21-12, 21-13 असा एकतर्फी विजय मिळवून आगेकूच केली. याआधी त्यानं पहिल्या फेरीत सिंगापूरच्या जेसन तेहला 21-16, 21-17 असं नमवलं होतं.
पुरुष दुहेरीत जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या सात्विक आणि चिराग जोडीनं मलेशियाच्या ब्रायन जेरेमी गुंटिंग आणि मुहम्मद हायकल जोडीचा 21-12, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव केला. या भारतीय जोडीनं पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या पुत्रा एरवियंशाह आणि बगास मौलाना जोडीविरुद्ध 21-19, 21-23, 21-10 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला होता.
किदाम्बी श्रीकांतसह युवा खेळाडूंचं आव्हान संपलं
पहिल्या फेरीत सिंगापूरच्या माजी जागतिक विजेत्या लो कीन यू याला 21-14, 21-15 असं चकित करणाऱ्या किदाम्बी श्रीकांतला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला. चायनीज तैपेईच्या जागतिक क्रमवारीत 49 व्या क्रमांकावर असलेल्या सु ली यांगनं श्रीकांतला 1 तास 10 मिनिटांच्या लढतीत 16-21, 21-11, 18-21 असं पराभूत केलं.
दुसऱ्या फेरीत पोहोचलेल्या इतर नवोदितांनाही पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या फेरीत जपानच्या नात्सुकी निदाइरावर 21-19, 13-21, 21-15 अशी ऐतिहासिक मात करणाऱ्या देविका सिहागला थायलंडच्या पिच्चामोन ओपातनिपुथकडून 21-23, 11-21 अशी हार मानावी लागली. मालविका बन्सोड देखील चीनच्या ऑलिम्पिक विजेत्या चेन युफेईकडून 12-21, 7-21 अशी पराभूत झाली. याशिवाय पहिल्याच फेरीत तरुण मन्नेपल्ली, आयुष शेट्टी, अनमोल खरब, उन्नती हुडा, तन्वी शर्मा, इशारानी बरुआ आणि पांडा भगिनी (ऋतपर्णा आणि श्वेतापर्णा) यांचे आव्हान संपुष्टात आलं होतं.
स्पर्धेची पुढील सामने
सुमारे 4.1 कोटी रुपये बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत आता उपांत्यपूर्व फेरीत सिंधूचा सामना जपानच्या अव्वल मानांकित अकानं यामागुचीशी होईल, तर लक्ष्य सेनचा सामना थायलंडच्या कुनलावुत वितिदसर्णविरुद्ध होणार आहे. सात्विक-चिरागची जोडी जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युइची शिजोगामी विरुद्ध उपांत्य फेरीसाठी खेळेल.

