थायलंड ओपन: भारताचे अनेक खेळाडू स्पर्धेतून बाहेर; सिंधू, श्रीकांत दुसऱ्या फेरीत


Thailand Open: बँकॉक येथील निमिबुत्र स्टेडियमवर सुरू असलेल्या प्रतिष्ठित ‘थायलंड ओपन 2026’ (BWF सुपर 500) बॅडमिंटन स्पर्धेत भारतासाठी दुसरा दिवस संमिश्र यशाचा ठरला. भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू, अनुभवी किदाम्बी श्रीकांत आणि पुरुष दुहेरीतील अव्वल मानांकित सात्विकसाईराज रँकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीनं आपापल्या सामन्यांत दिमाखदार विजय मिळवत दुसरी फेरी (Round of 16) गाठली आहे. मात्र, भारताच्या युवा खेळाडूंना कडव्या झुंजीनंतर पराभवाचा सामना करावा लागला.

दिग्गजांचे एकतर्फी विजय आणि थरारक पुनरागमन
महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत दोन वेळच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूनं अत्यंत आक्रमक खेळ केला. तिनं चायनीज तैपेईच्या तुंग सियु-तोंगचा अवघ्या 32 मिनिटांत 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष एकेरीत माजी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या किदाम्बी श्रीकांतनं मोठा उलटफेर केला. त्यानं सिंगापूरच्या 8 व्या मानांकित लो कीन यू याचा 21-14, 21-15 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवला.

पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं इंडोनेशियाच्या पुत्रा एरवियंशाह आणि बगास मौलाना यांच्याविरुद्धचा सामना 21-19, 21-23, 21-10 असा जिंकला. पहिल्या गेममध्ये 11-16 अशा पिछाडीवर असताना भारतीय जोडीनं सलग 7 गुण मिळवत पहिला गेम खिशात घातला होता. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये मात्र सात्विक-चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीला पुनरागमनाची कोणतीही संधी न देता पूर्ण वर्चस्व राखलं. तसेच महिला एकेरीत देविका सिहागनं जपानच्या नात्सुकी निदाइरा हिचा 21-19, 13-21, 21-15 असा पराभव करत पुढची फेरी गाठली.

भारताच्या युवा खेळाडूंची झुंज अपयशी
दुसरीकडं, भारताच्या नवोदित खेळाडूंनी जागतिक स्तरावरील दिग्गजांना घाम गाळायला लावला, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. 19 वर्षांच्या अनमोल खरबनं टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या चीनच्या चेन युफेईला तब्बल एक तास झुंजवलं. अनमोलनं पहिला गेम जिंकून खळबळ उडवली होती, मात्र अनुभवी चेननं नंतर पुनरागमन करत अनमोलचा 21-19, 13-21, 18-21 असा पराभव केला.

पुरुष एकेरीत आयुष शेट्टीला जपानच्या 6 व्या मानांकित कोदाई नाराओकाविरुद्ध 13-21, 21-17, 4-21 नं हार मानावी लागली. तर तरुण मन्नेपल्ली (जपानच्या कोकी वातानाबेकडून 12-21, 16-21) आणि उन्नती हुडा (थायलंडच्या पोर्नपावी चोचुवाँगकडून 21-11, 17-21, 16-21) यांचंही आव्हान पहिल्याच फेरीत संपलं. दुहेरीत एम. आर. अर्जुन आणि हरीहरन अमशकारुणन तसेच पांडा भगिनी (ऋतपर्णा व श्वेतापर्णा पांडा) पहिल्याच फेरीत पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

पुढील फेरीची आव्हाने
या स्पर्धेत आता दुसऱ्या फेरीत पी. व्ही. सिंधूचा सामना डेन्मार्कच्या आमली शुल्झशी होईल, तर किदाम्बी श्रीकांत चायनीज तैपेईच्या सु ली यांगविरुद्ध खेळेल.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.