Archery World Cup 2026 Stage 2: जागतिक आर्चरीमधील प्रतिष्ठेची मानली जाणारी ‘आर्चरी वर्ल्ड कप 2026 स्टेज-2’ ही स्पर्धा आज (5 मे) पासून चीनमधील शांघाय येथे सुरू झाली आहे. 10 मे पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत जगातील 44 देशांतील 300 हून अधिक सर्वोत्तम धनुर्धारी सहभागी झाले आहेत. भारतानं या स्पर्धेसाठी 16 सदस्यीय धडाकेबाज पथक मैदानात उतरवले असून, स्टेज-1 मधील उणीवा भरून काढण्याचं आव्हान भारतीय खेळाडूंसमोर असेल.
रिकर्व्ह गट: अनुभवी दीपिका कुमारी आणि अतनू दास यांच्यासह तरुणदीप राय, धीरज बोम्मादेवरा, अंकिता भकत आणि सिमरनजीत कौर यांच्यावर रिकर्व्ह प्रकारात भारताचा दुष्काळ संपवण्याची जबाबदारी आहे.
कंपाऊंड गट: जागतिक चॅम्पियन अदिती स्वामी आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांच्यासह अभिषेक वर्मा आणि ओजस देवतळे या अनुभवी खेळाडूंकडून पदकाची मोठी खात्री आहे.
स्टेज-1 मधील कामगिरी
मेक्सिको मध्ये पार पडलेल्या स्टेज-1 मध्ये भारतीय संघानं संमिश्र कामगिरी केली होती. त्यावेळी महिला कंपाऊंड संघानं (ज्योती सुरेखा, मधुरा ढमणगावकर आणि प्रगती) अमेरिकेला नमवून भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. मात्र, रिकर्व्ह प्रकारात भारताला एकही पदक मिळवता आलं नव्हतं. त्यामुळे शांघायमध्ये रिकर्व्ह खेळाडूंना आपली लय शोधून पदकतालिकेत भारताचं स्थान उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करावं लागणार आहेत.
या स्पर्धेतील कामगिरीमुळे खेळाडूंना वर्षाच्या शेवटी होणाऱ्या ‘वर्ल्ड कप फायनल’साठी थेट पात्रता मिळवण्याची संधी आहे. तसेच, आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या दृष्टीनं ही स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी सर्वात महत्त्वाची सराव चाचणी मानली जात आहे.

