जॅनिक सिनर अंतिम फेरीत; जोकोविच-नदालचा विक्रम मोडला

Madrid 2026: टेनिस विश्वातील सध्याचा ‘किंग’ मानल्या जाणाऱ्या जॅनिक सिनर यानं माद्रिद ओपन 2026 मध्ये आपला दबदबा कायम राखत अंतिम फेरीत (Final) धडक मारली आहे. शुक्रवारी रात्री (1 मे) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सिनरनं फ्रान्सच्या उदयोन्मुख आर्थर फिल्सचा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासोबतच सिनरनं टेनिस इतिहासातील असा एक विक्रम रचला आहे, जो रॉजर फेडरर किंवा नोव्हाक जोकोविचलाही त्यांच्या ऐन तारुण्यात जमला नव्हता.

स्पेनमधील ‘काजा मॅजिका’ स्टेडियमवर हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगलेला हा सामना फक्त 85 मिनिटे चालला. जॅनिक सिनरनं पहिल्या सेटपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्यानं आर्थर फिल्सची सर्व्हिस दोनदा ब्रेक करत पहिला सेट 6-2 ने खिशात टाकला. दुसऱ्या सेटमध्ये फिल्सनं थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला खरा, पण सिनरच्या अचूक फोरहँड आणि सर्व्हिससमोर त्याचे प्रयत्न तोकडे पडले. सिनरनं हा सेट 6-4 ने जिंकून दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला.

जोकोविच आणि नदालला टाकले मागे
या विजयामुळे 24 वर्षीय जॅनिक सिनरनं नऊच्या नऊ ‘एटीपी मास्टर्स 1000’ स्पर्धांची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे. हे यश मिळवणारा तो टेनिस इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम नोव्हाक जोकोविचच्या (25 वर्षे) नावावर होता. आता सिनरनं जोकोविच, राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांसारख्या दिग्गजांना मागे टाकत आपलं नाव सुवर्णअक्षरांनी कोरलं आहे.

सिनर विरुद्ध झ्वेरेव्ह
सलग 27 मास्टर्स सामने जिंकणारा सिनर आता रविवारी, 3 मे 2026 रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्ह याच्याशी भिडणार आहे. झ्वेरेव्हनं दुसऱ्या उपांत्य फेरीत अलेक्झांडर ब्लॉकक्सचा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. जर सिनरने ही स्पर्धा जिंकली, तर तो सलग पाच मास्टर्स 1000 जेतेपदे जिंकणारा जगातील पहिला खेळाडू ठरेल. त्यामुळे त्याला आणि त्याच्या चाहत्यांना आशा आहे की, नक्की जिंकणार.

Related articles

Comments

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Share article

spot_img

Latest articles

Newsletter

Subscribe to stay updated.