Thomas And Uber Cup: बॅडमिंटन विश्वातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘थॉमस आणि उबेर कप 2026’ स्पर्धेला शुक्रवार, 24 एप्रिल 2026 पासून डेन्मार्कच्या होर्सन्स शहरात सुरुवात झाली आहे. 3 मे 2026 पर्यंत चालणाऱ्या या जागतिक सांघिक स्पर्धेत पहिल्या दिवशी भारतीय पुरुष संघानं कॅनडावर 4-1 नं विजय मिळवत धडाकेबाज सुरुवात केली, मात्र महिला संघाला यजमान डेन्मार्ककडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला आहे.
गतविजेत्या भारतीय पुरुष संघानं ‘अ’ गटातील पहिल्या लढतीत कॅनडावर वर्चस्व गाजवलं. सुरुवातीला स्टार खेळाडू लक्ष सेनला व्हिक्टर लाईकडून पराभव स्वीकारावा लागल्यानं भारत 0-1 नं मागं पडला होता. मात्र, त्यानंतर भारतानं जोरदार पुनरागमन केलं. सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं जोनाथन आणि केविन ली यांचा 21-10, 21-11 असा पराभव केला. त्यानंतर युवा खेळाडू आयुष शेट्टीनं ब्रायन यांगला सरळ सेटमध्ये नमवून भारताची बाजू भक्कम केली. एम. आर. अर्जुन-हरीहरन जोडी आणि अनुभवी किदाम्बी श्रीकांत यांनी आपापले सामने जिंकत भारताचा 4-1 ने विजय निश्चित केला.
दुसरीकडं, उबेर कपमध्ये भारतीय महिला संघाला डेन्मार्कच्या आव्हानासमोर हार मानावी लागली. भारताची सुरुवात दमदार झाली होती. स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधूने लाईन ख्रिस्तोफरसनचा 21-13, 18-21, 21-17 असा पराभव करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, त्यानंतर एकेरीत उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांना पराभव पत्करावा लागल्याने भारताची स्थिती नाजूक झाली. दुहेरीतही श्रुती मिश्रा आणि प्रिया कोन्जेन्बाम यांना विजय मिळवता आला नाही, ज्यामुळे डेन्मार्कनं ही लढत 3-2 अशी खिशात टाकली.
ही संपूर्ण स्पर्धा डेन्मार्कच्या ‘फोरम होर्सन्स’ (Forum Horsens) येथे खेळवली जात आहे. भारतीय पुरुष संघाचा पुढचा सामना 27 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल, तर महिला संघाला आज, 25 एप्रिल रोजी युक्रेनविरुद्ध खेळायचे आहे. बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी महिला संघाला युक्रेनविरुद्ध विजय मिळवणे अनिवार्य आहे.

