IPL 2026: काल ( बुधवार, 22 एप्रिल 2026) झालेल्या आयपीएलच्या 32 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) संघानं लखनऊ सुपर जायंट्स (LSG) वर 40 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा चुरशीचा सामना लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर पार पडला.
लखनऊ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. राजस्थान रॉयल्सनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 159 धावा केल्या. राजस्थानची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. कारण मोहम्मद शमीनं यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल यांना स्वस्तात बाद करून त्यांना (राजस्थान) 44/3 अशा अडचणीत आणलं होतं. मात्र, अष्टपैलू रवींद्र जडेजानं 29 चेंडूंत नाबाद 43 धावांची महत्वपूर्ण खेळी करून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. लखनऊकडून मोहम्मद शमी, प्रिन्स यादव आणि मोहसिन खान यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
प्रत्युत्तरात 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सचा डाव पूर्णपणे विखुरला. जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांनी सुरुवातीच्या षटकांतच आयुष बदोनी, कर्णधार ऋषभ पंत आणि एडन मारक्रम या तिघांना शून्यावर बाद करून लखनऊची अवस्था 31/3 अशी केली. या परिस्थितीत असूनही मिचेल मार्शनं 41 चेंडूंत 55 धावा करून एकाकी झुंज दिली, पण त्यालाही इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. शेवटी त्याचीही विकेट गेली आणि लखनऊचा संपूर्ण संघ 18 व्या षटकांत अवघ्या 119 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे राजस्थाननं हा सामना अगदी सहज जिंकला.
सामना कुठे फिरला?
हा सामना खरं तर राजस्थानच्या आक्रमक गोलंदाजीमुळे फिरला. कारण अगदी सहज वाटणाऱ्या सामन्यात सुरूवातीलाच लखनऊच्या महत्त्वाच्या विकेट्स पडल्या त्यामुळे सामनाही राजस्थानच्या बाजूनं झुकला. जोफ्रा आर्चरनं 32 धावांत 3 बळी घेऊन लखनऊच्या मधल्या फळीचा कणा मोडला. तर नांद्रे बर्गर आणि ब्रिजेश शर्मा यांनी प्रत्येकी २ बळी घेत विजयावर शिक्कामोर्तब केलं. लखनऊनं 103/4 अशा चांगल्या स्थितीतून आपल्या शेवटच्या 6 विकेट्स अवघ्या 16 धावांत गमावल्या, जो त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं.
या विजयामुळे राजस्थान रॉयल्सनं गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे, तर लखनऊ सुपर जायंट्ससाठी हा सलग चौथा पराभव ठरला आहे

