PSL and IPL: श्रीलंकेचा टी-20 कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू दासुन शनाका (dasun shanaka) याला पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2026 चा करार मोडून आयपीएलमध्ये सहभागी झाल्यामुळे शनाकावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. या कारवाईमुळे तो 2027 च्या पीएसएल हंगामात खेळू शकणार नाही.
नेमकं प्रकरण काय आहे?
दासुन शनाका पीएसएल 2026 मध्ये ‘लाहोर कलंदर्स’ संघाकडून खेळण्यासाठी कराराबद्ध होता. मात्र, स्पर्धा सुरू असतानाच त्यानं वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली. धक्कादायक बाब म्हणजे, पीएसएल सोडून तो थेट भारतात आयपीएल खेळण्यासाठी दाखल झाला. म्हणजेच त्यांन पीएसएलमध्ये न खेळता आयपीएलला पसंती दिली आहे. यामुळेच त्याचा फटका शनाकाला बसला आहे. पीसीबीनं PSL मध्ये न खेळल्यामुळे याला कराराचा भंग मानलं असून शिस्तभंगाची कारवाई म्हणून ही बंदी घातली आहे. शनाकानं या निर्णयावर दिलगिरी व्यक्त करताना म्हटलं की, त्याचा हेतू कोणाला दुखावण्याचा नव्हता, मात्र तरीही पीसीबीनं आपलं धोरण स्पष्ट केलं आणि त्याच्यावर ही कारवाई केली. त्यामुळे आता शनाकाला एक वर्ष तरी PSL खेळता येणार नाही.
शनाका सध्या आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्स (RR) संघाचा भाग आहे. इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर राजस्थाननं शनाकाचा 2 कोटी रुपयांच्या करारासह बदली खेळाडू म्हणून समावेश केला आहे. पीएसएलमधील बंदीचा त्याच्या आयपीएल खेळण्यावर कोणताही परिणाम होणार नसला तरी, पाकिस्तानमधील त्याच्या भविष्यातील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
इतर खेळाडूंनाही PSL ने घातलेली बंदी
पीसीबीनं फक्त शनाकावरच नाही, तर इतरही काही खेळाडूंवरही कडक कारवाई केली आहे. झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुजरबानी याच्यावर तर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्यानं सुद्धा पीएसएल सोडून कोलकत्ता नाईट रायडर्समध्ये (KKR) जाण्याचा निर्णय घेतला होता. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉश याच्यावरही एक वर्षाची बंदी घालण्यात आली आहे.
आणखी हेही वाचा
‘या’ कारणांमुळे मुंबईने मिळवला विजय-https://agcsport.tv/cricket/mumbai-won-because-of-these-reasons/
आगामी हॉकीच्या स्पर्धेसाठी ‘या’ ३६ खेळाडूंची झाली घोषणा-https://agcsport.tv/athletics/these-36-players-announced-for-upcoming-tournament/

