Rashid Khan: अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज आणि गुजरात जायंट्स (GT) कडून खेळत असलेला राशिद खान यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘राशिद खान: फ्रॉम स्ट्रीट्स टू स्टारडम’ (Rashid Khan: From Streets to Stardom) या नवीन पुस्तकात त्यानं आपल्या निष्ठा आणि देशाप्रती असलेल्या प्रेमाचा एक विलक्षण किस्सा मांडला आहे. एप्रिल 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकानुसार, राशिदला भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (australia) या दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डाशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तींकडून त्यांच्या देशासाठी खेळण्याची ऑफर आली होती. पण त्यानं त्यावर स्पष्ट नकार दिला आहे आणि आपल्याच देशाकडून खेळायचं आहे असं त्यानं सांगितलं आहे.
ऑफर कधी आणि कशी मिळाली?
भारतीय ऑफर: राशिदनं पुस्तकात नमूद केलं आहे की, आयपीएल 2023 दरम्यान एका वरिष्ठ भारतीय क्रिकेट अधिकाऱ्यानं त्याला ही ऑफर दिली होती. त्या अधिकाऱ्यानं म्हटलं होतं की, “तुझ्या देशातील (अफगाणिस्तान) परिस्थिती सध्या खूप खराब आहे. तू भारतात येऊन राहू शकतोस, आम्ही तुला भारताची कागदपत्रे म्हणजेच भारतीय नागरिकत्व देऊ, येथेच राहा आणि आमच्याकडून (भारताकडून) क्रिकेट खेळ”.
यावर त्याला काहीही बोलायला सुचलं नाही पण या ऑफरवर राशिद खाननं नम्रपणे उत्तर दिलं की, “तुमच्या प्रेमाबद्दल मी खूप आभारी आहे, पण मी माझ्या अफगाणिस्तान देशासाठीच क्रिकेट खेळणार. जर मी माझ्या देशासाठी खेळू शकत नसेल, तर मी कोणाकडूनही खेळणार नाही”. असं त्यानं सांगितलं.
राशिद खान हा सध्याच्या काळातील जगातील सर्वोत्कृष्ट टी-20 (T20) गोलंदाज मानला जातो. त्याच्या आक्रमक गोलंदाजीमुळे आणि कोणत्याही परिस्थितीत विकेट मिळवण्याच्या क्षमतेमुळे तो जगभरातील टी-20 लीगमध्ये सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. भारतामध्ये आयपीएलमुळे तो घराघरात पोहोचला आहे, तर ऑस्ट्रेलियात ‘बीबीएल’ मध्ये तो ‘ॲडलेड स्ट्राईकर्स’चा स्टार आहे. त्याच्यासारखा जागतिक दर्जाचा खेळाडू आपल्या संघात असावा, ही प्रत्येक देशाची इच्छा असते. त्यामुळेच या देशांनी (भारत आणि ऑस्ट्रेलिया) त्याला ऑफर दिल्या होत्या.
राशिद खानची आतापर्यंतची कामगिरी
राशिद खाननं टी-20 फॉरमॅटमध्ये 700 पेक्षा जास्त बळी घेण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आणि असा करणारा तो पहिलाच गोलंदाज आहे. ज्यानं 700 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
T20Is: 193 बळी (115 सामने)
ODIs: 210 बळी (117 सामने)
Tests: 45 बळी (6 सामने)
IPL: आयपीएलमध्ये त्यानं आतापर्यंत 141 सामन्यांत 164 बळी घेतले आहेत.

