सोची (रशिया): रशियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय अंडर-17 महिला फुटबॉल संघाचा (Young Tigresses) प्रवास पराभवानं संपला आहे. तरी भारतीय खेळाडूंनी रशियन संघाला दिलेली झुंज कौतुकास्पद ठरली आहे. सोची येथील ‘मॅटसेस्टा फुटबॉल सेंटर’ येथे शुक्रवारी (17 एप्रिल) खेळवल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम मैत्रीपूर्ण सामन्यात रशियानं भारताचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला आहे. या पराभवासोबतच रशियानं ही तीन सामन्यांची मालिका 3-0 अशा फरकानं खिशात टाकली आहे.
कालच्या सामन्यात भारतीय बचावफळीनं पहिल्या सत्रात अत्यंत शिस्तबद्ध खेळ दाखवला. रशियाच्या आक्रमकांना रोखून धरण्यात भारतीय खेळाडूंना यश आलं, ज्यामुळे मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना गोल करता आला नाही. मात्र, दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच 46 व्या मिनिटाला रशियाच्या वॅलेरिया मेनालिओव्हानं गोल करून भारताच्या अडचणीत वाढ केली. त्यानंतर 80 व्या मिनिटाला पोलिना फ्रोलोव्हानं रशियाची आघाडी 2-0 केली. सामन्याच्या शेवटच्या क्षणी आणखी एका खेळाडूनं तिसरा गोल करून रशियाचा विजय निश्चित केला. भारताची मध्यरक्षक जुलान म्हात्रे हिला 82 व्या मिनिटाला लाल कार्ड (Red Card) मिळाल्यामुळे भारताला शेवटची काही मिनिटं 10 खेळाडूंसह लढावं लागलं.
या दौऱ्यात एकूण 3 मैत्रीपूर्ण सामने खेळवले गेले आणि दुर्दैवानं भारताला तिन्ही सामन्यांत पराभव स्विकारावा लागला. पहिल्या सामन्यात रशियानं 4-0 अशा मोठ्या फरकानं सामना जिंकला, दुसऱ्या सामन्यातही रशियानं 3-0 नं बाजी मारली आणि नुकत्याच झालेल्या तिसऱ्या सामन्यातही 3-0 नं निकाल रशियाच्या बाजूनं लागला. त्यामुळे रशियाच्या खेळाडूंनं पुर्णपणे भारतीय खेळाडूंच आव्हान धुडकावून लावलं आणि सगळ्या सामन्यात भारतावर एकतर्फी विजय मिळवला.
प्रशिक्षक पाचवेला काँटी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा हा भारतीय संघ पुढील महिन्यात चीनमध्ये होणाऱ्या ‘एएफसी अंडर-17 महिला आशिया चषक’ (AFC U17 Women’s Asian Cup) स्पर्धेची तयारी करत आहे.
रशियासारख्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि शारीरिकदृष्ट्या बलवान संघाविरुद्ध खेळल्यामुळे भारतीय मुलींना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कठीण दबावाचा सामना करण्याचा मोठा अनुभव मिळाला आहे. या अनुभवाचा फायदा त्यांना आशिया चषकात ऑस्ट्रेलिया आणि जपानसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध खेळताना निश्चितच होईल.
आणखी हेही वाचा
युकी भांब्री-मायकल व्हीनसचे आव्हान सेमिफायनलमध्ये संपुष्टात-https://agcsport.tv/tennis/yuki-bhambri-michael-venus-challenge-ends-in-semifinals/

