अहमदाबाद: आयपीएल 2026 च्या आजच्या सामन्यात (17 एप्रिल) गुजरात टायटन्स (GT) आणि कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) हे दोन संघ भिडणार आहेत. अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. दोन्ही संघांसाठी हा सामना गुणांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
यजमान गुजरात टायटन्सनं या हंगामात आतापर्यंत 4 सामने खेळले असून 2 विजय आणि 2 पराभवांसह ते 4 गुणांनिशी गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे, गुजरातनं मागिल सलग दोन सामन्यांत विजय मिळवून आपला फॉर्म परत मिळवला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकण्याचा ते प्रयत्न करतील. दुसरीकडं, कोलकत्ता नाईट रायडर्सची अवस्था यंदा अत्यंत नाजूक आहे. कारण केकेआरचे अनेक खेळाडू सध्या फॉर्ममध्ये नाहीत त्यामुळे त्याचाच फटका त्यांना बसत आहे. आणि केकेआरला पराभवाचा सामना करावा लागत आहे. त्यांनी खेळलेले पाचही सामने गमावले असून (एक सामना पावसामुळे रद्द) फक्त 1 गुणासह ते गुणतालिकेत सर्वात तळाला म्हणजेच 10 व्या स्थानावर आहेत. केकेआरला आजच्या सामन्यात विजय मिळवणं अत्यंत गरजेचं झालं आहे. त्यामुळे केकेआरच्या संघाला आणि चाहत्यांना आशा आहे की, आजचा सामना ते जिंकतील.
हेड-टू-हेड रेकॉर्ड
आयपीएलच्या इतिहासात या दोन संघांमधील चुरस नेहमीच पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांमध्ये एकूण 6 सामने खेळले गेले असून, दोन्ही संघांनी प्रत्येकी 3 विजय मिळवले आहेत. आजच्या सामन्यात जो संघ जिंकेल, तो एकमेकांविरुद्धच्या रेकॉर्डमध्ये आघाडी घेईल.
आजची संभाव्य प्लेइंग 11
गुजरात टायटन्स: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, राहुल तेवाटिया, रशिद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, अशोक शर्मा, प्रसिद्ध कृष्णा.
कोलकत्ता नाईट रायडर्स: अजिंक्य रहाणे (कर्णधार), सुनील नरेन, फिन ॲलन, कॅमरन ग्रीन, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, रोवमन पॉवेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी.

